Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनिर्णय क्षमता

निर्णय क्षमता

पूर्णिमा शिंदे

निर्णय क्षमता अचूक असणं हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे अंग आहे. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये निर्णयाला अधिक महत्त्व आहे. आपण ज्या रस्त्याने चालतो त्या रस्त्यावर वळण येतात! कुठे वळायचं? हा रस्ता आपल्याला ठाऊक नसतो त्यावेळी आपला निर्णय महत्त्वाचा असतो. उदा. आपण ड्रायव्हिंग सीटवर बसलेलो आहोत. आपण सगळ्या कुटुंबाचे सारथ्य करतोय. मग तुम्हाला निश्चित स्थळी पोहोचायचं असेल तर आपल्याकडे योग्य ती अचूक निर्णय क्षमता असायला हवी. आपल्याला आपण नेमकं कोठे पोहोचलोय आणि काय करायला हवं हे समजले पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेळच्या वेळी निर्णय घ्यावे लागतात. उदा. भाजी घेताना, भाजी करताना याही गोष्टी आपण ध्यानात ठेवतोच. ही तर झाली रोजच्या जीवनातील छोटीशी गोष्ट. पण सर्वात मोठी गोष्ट काय? की शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये शालेय जीवन संपल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या महाविद्यालयांमध्ये कोणती शाखा निवडावी? यामध्ये आपला निर्णय महत्त्वाचा असतो! कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, इंजिनीयरिंग, वैद्यकीय इ. आपला कल कुठे आहे? आपले अभिरुची कुठे आहे या सगळ्या गोष्टी आपल्या निर्णय क्षमतेवर आधारित असतात. एक पाऊल जर चुकलं तर मग पुढे आपले निर्णय डळमळीत होतात. मग पश्चातापाशिवाय काहीच हाती पडत नाही. नाण्याचे दोन बाजू. एक काटा, एक छापा. एखादा निर्णय जर चुकला तर पुढे परिस्थितीच बदलून जाते आणि त्याचे होत्याचं नव्हतं होतं. मला हे व्हायचं होतं पण कालांतराने माझे तिकडे सिलेक्शन झालं नाही वगैरे वगैरे. अशावेळी आपल्या निर्णयाशी ठाम राहता आलं पाहिजे. त्यासाठी जिद्द आणि हट्ट ठेवा.

आपण आपले निर्णय सुद्धा आपले जीवन घडवतात. लग्नाचेही तसेच. लग्न जुळताना सुद्धा आलेले स्थळ मंजूर नसताना देखील आई-वडिलांचे ऐकले, निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. लग्न केलं. आयुष्यभर पस्तावण्यापेक्षा आपण आपापल्या मर्जीने निर्णय घेऊन जर विवाह केला तर तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आनंदाचे तसेच आहे. आनंदाच्या वाटा निर्माण करण्यासाठी आपला निर्णय आपण घ्यावा लागतो. ठरवून दिलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा आपण आपली वाट शोधावी. त्या वाटेवरून चालावं. असतील काटे वेचावे, नसतील तर फुलांच्या पायघड्या. पण आपली वाट आपण निर्माण करावी. प्रत्येकवेळी घरातल्यांचे, मोठ्यांचा ऐकून आपल्यावर लादले गेलेली निर्णय आणि त्यामुळे कोलमडून दुर्बल झालेले मन कसे उभारी घेणार? त्याचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी मनाचंही ऐकायला हवं ! मनही हे सांगत असतं तेच जर केलं मग ते कोणत्याही वाटेवर असेल कोणत्याही गोष्टीत असेल यश, प्रसिद्धी, पैसा, पद किंवा नाती आणि ते सर्वांच्याच भल्याच असेल. निश्चित चांगला निर्णय घेण्यास मुभा असते. त्यात वेळेचे भान ठेवावे. वेळेचे गणित चुकले तर पश्चातापाशिवाय काहीच हातात येत नाही. जशी शेतातली पेरणी त्या त्या वेळी करावी लागते तशी विचारांची पेरणी सुद्धा! मनावर त्या त्या वेळीच करावी लागते आणि त्या त्या वेळीच वेळेवर निर्णय घ्यावे लागतात. ही निर्णय क्षमता आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहे. या टप्प्यावर स्वतःचा ठामपणा, आत्मविश्वास असणं गरजेचं असतं! मनाला उभारी घेण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, कसोटी, साहस या गोष्टी निर्णया क्षमते इतक्याच महत्त्वाच्या आहेत. नोकरी की व्यवसाय, व्यवसाय की नोकरी? यातही अडकणारे खूप आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असताना मनासारखी नोकरी नाही!

गरज म्हणून स्वीकारलेली मिळाली पर्यायाने मग मार्ग बदलतो. उदरनिर्वाहाचं निकडीचे साधन म्हणून आहे तो जॉब टिकवला जातो. यामध्येही निर्णय क्षमता असली तरी निर्णयाचा कस लावायला सर्व क्षमता कमीच पडतात! आपल्या इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी आपण प्रभावी असले पाहिजे. हा प्रभाव आपल्या स्वभावात, विचारात आणि कृतीत असला पाहिजे. आपण आपल्या निर्णयाने जगलं पाहिजे. इतरांच्या मतांचा आदर असावा. पण ती मतं आपल्यावर लादून येऊ नये. कारण आपापलं आयुष्य जगत असताना आपल्या मनावर इतरांचा पगडा हवा कशाला? अशाने तर मनाचे दुबळेपण येतं. एक वेळ परिस्थितीचे दुबळेपण चालेल पण मनाचा आणि विचारांचा दुबळेपणा कधीच असू नये. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद स्वतःमध्ये असली पाहिजे. ती जिद्द, आनंदी राहण्याची उत्सुकता, प्रसन्नता टिकवून ठेवली पाहिजे. केवळ वैताग, आळस, नैराश्य, चिडचिड, संघर्ष यातून झपाटून उठून निर्णयाने या सर्व गोष्टींचा प्रतिकार करता आला पाहिजे. ही सकारात्मकता आपल्यामध्ये असायला हवी. स्वतःवर प्रेम करणे, स्वतःचा स्वाभिमान असणे, स्वतःच्या मनाला घडवणं आणि शिकवणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच गोष्टी आरशात बघून सर्वप्रथम म्हणा की मी जसा आहे तसा मी स्वतःला स्वीकारलं, मी स्वतःवर प्रेम करते, माझा आत्मसन्मान, स्वाभिमान, सकारात्मक बदल करण्याची माझ्यात कुवत, ताकद आहे. आपण हसले तर आरसा हसेल आणि आपण रडलो तर आरसा रडेल इतकी स्वतःच्या विचारांमध्ये ताकद असली पाहिजे.

सकाळी उठून मी स्वतः कोण आहे? मला आज काय करायचे आहे? हे तुम्ही आरशात बघून ठरवा! हा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे! हीच वेळ आहे, मनावर ताबा ठेवण्याची. यावरील सर्व विचारांना भविष्यात उतरविण्याची. जितकं भूतकाळामध्ये डोकावाल तितकं तुम्ही गढूळ होणार आहात. भूतकाळाची जळमटे बाजूला करून नवीन दिवस, नवी आशा, नवी स्वप्न साकारण्याची, अंतर्बाह्य मन बदलण्याची आवश्यकता आहे आणि ते बदलावे. आपण काय आहोत ते ओळखावे, स्वयंप्रतिमा जपावी व स्व आदर करावा. जसे पाहिजे तसे मिळवा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करा, स्वतःवर प्रेम करा, लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या विचारांना जर महत्त्व दिले तर त्या विचारांना अर्थ प्राप्त होईल आणि तरच ते विचार तुमचं आयुष्य घडवू शकेल! आणि दुसऱ्याच्या मतांना तुम्ही जर किंमत दिली तर केवळ आणि केवळ तुम्ही दुसऱ्याचे दुसऱ्याच्या हुकमावर चालणारे मूर्ख बनाल. मग तुम्हाला वैतागलेले आयुष्य जगायचे की वैचारिक प्रगल्भतेचे? तुम्हाला निराशेत जगायचंय की ताजेतवाने प्रसन्नतेने? उत्साही जगायचे… तुमच्या कुलपाची चावी दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे की ती स्वतःच्या हातात ठेवायची आहे ! चुकून सुद्धा दुसऱ्यावर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिका, मनाला शिकवा, स्वावलंबणाची, स्वाभिमानाची, स्व:मताची लढाई तुम्ही लढा. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा जगण्यातला आनंद स्वतः उपभोगण्यासाठी जगा. भरभरून जगा, नवीन बदल स्वीकारा, तुमच्या जाणिवांना सामोरे जा. विस्कटले असेल आयुष्य त्याची व्यवस्थित घडी लावा. पुष्कळदा आपण तोच बाऊ करतो आणि पुढे जात नाही. पण योग्यवेळी अचूक निर्णय घेतला आणि सकारात्मक यादीमध्ये तुम्हाला जे जे हवे ते सगळे बदलणारच. स्वतःच प्रेम, विश्वास, स्वतःची कुवत, पात्रता, नातेसंबंध, आर्थिक समस्या, आयुष्य या सगळ्यांवर तुम्ही निश्चित एक ना एक दिवस आपल्या निर्णयाने जिंकाल.इच्छित इप्सित साध्य करण्यासाठी धडपडा. नवनव्या संकल्पना स्वप्न साकारण्यासाठी पूर्ण करा. माझ्या जीवन पद्धतीमध्ये मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मी मिळवणारच! मला आलेले सर्व अनुभव मी स्वीकारले पण त्या समस्यावर मात करून मी दिमाखात उभी राहणार! एक ना एक दिवस आयुष्याचे सोने करणार. संधीचे सोने करणार आणि माझे सर्व निर्णय मी स्वीकारणार.

व्यक्तिमत्त्व विकासाच्या अंगाने विचार करता आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये, चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखी येतात. मग आयुष्यात कोणाची बेरीज करायची. कुणाला केव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार तर कधी भागाकार… मग उत्तर मिळतीलच की नातेवाइकांना हातचा समजू नये ते इंटू ब्रॅकेट (कंसात) असावे. कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही. सर्वात महत्त्वाचं “दृष्टिकोन”. आपल्या दृष्टिकोन हा समतोल साधणारा असावा आणि सकारात्मक असावा. समतोल जीवनाचा असेल! विचारांचा असेल!! परिस्थितीचा असेल. “स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमची खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही.” चला आजच यादी करा आपल्या उर्वरित जीवनासाठी चांगल्या निर्णयाची आपल्या जबाबदारीची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -