पूनम राणे
हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करत असताना खिडकीतून एक वृद्ध भिकारी खाण्याचा मूक अभिनय करीत असताना त्यांनी पाहिला. आपलं खाणं थांबवत हॉटेलमधून एक बर्गर घेऊन त्या, भिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या. त्याच्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या, ‘‘भूक लागली असेल हे खाऊन घ्या.” असं म्हणून त्या वळल्या, आणि पुन्हा म्हणाल्या, ‘‘माझ्यासोबत आत चला, माझ्यासमोर बसून खा. गहिवरत ती वृद्ध व्यक्ती नको…नको … मला आत बसू देणार नाहीत, म्हणत होती.” अरे पण मी आहे ना, चल माझ्यासोबत. असं म्हणत त्यांनी त्याला हॉटेलमध्ये आणलं. आपल्या सोबत बसवून बर्गर खायला लावला. त्याच्याशी त्यांनी हृदयसंवाद साधला. त्याची व्यथा एकूण त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्यांनी त्याला काही पैसे देऊ केले; परंतु त्यांनी काही घेतले नाही. जाताना मात्र त्या वृद्ध व्यक्तीने त्यांच्या हातावर एक चिठ्ठी ठेवली आणि म्हणाले , ‘‘मी गेल्यानंतर उघडून वाचा.” वृद्ध व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्यांनी तो कागद उघडला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. त्या चिट्टीत लिहिलं होतं, ‘‘आज मी आत्महत्या करणार होतो”…
असाच एक प्रसंग लहानपणीचा, वय वर्ष साडेतीन. दारात डबे बाटलीवाले म्हातारे आजोबा आले होते. त्यांना पाहून त्यांना वाटलं की, यांना म्हातारपणी असे काम करावे लागते. म्हणून घरातील आईच्या हिऱ्याच्या कुड्या त्या आजोबांना दिल्या. दोन दिवसातच दिवाळीचा सण होता. आई काहीतरी शोधत असताना त्यांनी पाहिलं. खरं म्हणजे त्या कुड्या आजीने आईला दिल्या होत्या. त्यामुळे विशेष होत्या. एवढ्यात दारावरची बेल वाजली. आजोबा दारात हिऱ्याच्या कुड्या घेऊन हजर होते. त्या कुड्या आईला देत ते म्हणाले, ‘‘अहो आम्ही वारकरी. या कुडया घेऊन आम्ही पंढरीच्या वाटेवर पाय ठेवू शकत नाही. कृपाकरून पोरीला ओरडू नका.” त्यावर आई म्हणाली, ‘‘हात नेहमी देता ठेवावा.” मात्र तिने स्वतः कमावून द्यावे एवढेच… दातृत्वाचा संस्कार, माणुसकीची जाण आणि सामाजिकतेचे भान, वात्सल्य, प्रेम, स्वभावातील ऋतुजा, सात्त्विक भाव, अंध अपंगांविषयी कणव, याची एकत्रित गुंफण म्हणजे अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड.
एकदा मायलेकीचा सुसंवाद चालला होता. आई म्हणाली, ‘‘तुम्ही दोघीजणी माझे दोन डोळे आहात.” यावर त्यांनी विचारलं,‘‘आई, आई, मग सांग ना… तुझा उजवा डोळा कोणता आणि डावा डोळा कोणता?” अर्थात दोघी मुलींपैकी सर्वात आवडती कोण? मी का ताई!” असा प्रश्न त्यांना पडला. यावर क्षणाचाही विचार न करता, आई म्हणाली, ‘‘हे बघ, उजवा, डावा असे काही नसते आणि दोन्ही डोळ्यांनी सारखेच दिसतं.” तुम्ही दोघी माझ्यासाठी सारख्याच! ‘‘आईच्या सकारात्मक सुसंवादातून, डॉ. निशिगंधा आणि डॉ. प्राजक्ता या दोन कन्या संस्कारीत झाल्या. डॉ. निशिगंधा यांच्या गुरू सुलभाताई देशपांडे, यांच्या पतीचे निधन झाले, हे समजल्यावर डॉ. निशिगंधा त्यांना भेटायला गेल्या होत्या. येणारे-जाणारे सुलभा देशपांडे मॅडमचे सांत्वन करत होते. डॉ. निशिगंधा यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून सुलभा देशपांडे म्हणाल्या, ‘‘अगं रडतेस काय!, ‘‘तुला नाटक, चित्रपटात अभिनय करायचा आहे ना, मग पाहून घे. अभिनय करताना उपयोगी येईल”
डॉ. निशिगंधा यांना आश्चर्य वाटलं, ‘‘दुःखाच्या क्षणी आपल्या गुरू आपल्या शिष्याला प्रॅक्टिकल अनुभव देत होत्या.”
विद्यार्थी मित्रांनो, असे आई-वडील, गुरू ज्यांना लाभतात. त्यांच्यासाठी कवी बा. भ. बोरकर यांच्या पुढील ओळी सार्थ ठरतात. “ जे डोळे देखणे, जे कोंडीती साऱ्या नभा वोळीती दुःखे जनाच्या सांडती नेत्रप्रभा” दूरदर्शनवरील मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम करतात. फुलपंखी, रामची गोष्ट, बोन्साय, अनुष्का अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. स्त्रियांचे आत्मभान, एड्स जनजागृती अभियान, अंध, अपंग, गरजू, गरीब विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती, असे अनेक उपक्रम डॉ. निशिगंधा एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवतात. सोशल हिस्ट्री, स्त्रियांची बदलती भूमिका, कवयित्री शांताबाई शेळके या तीन विषयांवर त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. सोज्वळ अभिनेत्री, उत्कृष्ट लेखिका, संपादिका, निवेदिका म्हणून त्यांच्या यशाचा मंडप नभांगणाला स्पर्श करीत आहेत आणि त्यांच्या अंतर्यामीचं देवत्व जग अनुभवत आहे.