नागपूर : ३१ डिसेंबरला जगभर इंग्रजी नवीन वर्षाचा जल्लोष सुरूच असतो. हे नवीन वर्ष साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींना घरबसल्या पार्टी करायला आवडते, काहींना फिरायला आवडत, तर काही क्लब सारख्या ठिकाणी पार्टी करण्यास पसंत करतात. मात्र आता महाराष्ट्रातील क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत. विधान परिषदेत शुक्रवारी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्याने आता क्लबमधील सदस्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जीएसटी व मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत मोठ्याप्रमाणात कर जमा होणार आहे.
कोणत्याही क्लबमध्ये आतापर्यँत मद्याच्या पेगवर वॅट आकारला जात नव्हता. त्यामुळे हॉटेल पेक्षा क्लबचे मद्य स्वस्त होते. मात्र सुधारित विधेयकांनुसार बारप्रमाणेच क्लबच्या पेगवरही १० टक्के व्हॅट द्यावा लागेल. खाद्यपदार्थांच्या मेनूतही हॉटेलप्रमाणेच ५,१२ किंवा १८ टक्केप्रमाणेच क्लबच्या खाद्यपदार्थांवरही जीएसटी भरावा लागेल.
शुक्रवारी विधानसभेने मंजूर केलेले महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले आणि मंजूर झाले. या सुधारणेमुळे एखाद्या संस्थेने किंवा क्लबने सदस्यांना केलेल्या मद्य व खाद्य पदार्थांच्या विक्रीवर आता राज्य सरकारला टॅक्स आकारता येईल. म्हणजेच क्लबला खरेदीवर मिळत असलेल्या सवलतीचा लाभ ते सदस्यांनाही देत होते पण आता नवीन विधेयकांमुळे तसे करता येणार नाही. क्लबने वस्तू विकत घेतली तर त्यांच्यासाठी वेगळा नियम असेल आणि क्लबच्या सदस्यांनी ती घेतली तर त्याला मूल्यवर्धित कर आणि जीएसटी अशा दोन्ही गोष्टी भराव्या लागणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. म्हणजेच आता थर्टी फर्स्ट पूर्वीच क्लब महागणार आहेत.