निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण.… कोकणातील सौंदर्य थंडीतच अधिक खुलतं. सध्या कोकणात हुडहुडी भरणाऱ्या थंडीची चाहूल दिली आहे. उशिरा का होईना पण कोकणात दाट धुकं पडायला लागले आहे. पण यासाठी डिसेंबरची वाट पाहावी लागली आहे. पण याच थंडीच्या चाहुलीने सध्या कोकणातला निसर्ग खुलला आहे. कोकणातल्या घाट रस्त्यात धुके पाहायला मिळते आहे. अशावेळी कोकणातील गुलाबी थंडी अन् चुलीची धग म्हणजे एक ऊब देणारी ठरते.
रवींद्र तांबे
कोकणामध्ये मागील सात-आठ वर्षांपासून कडक थंडीसाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागते. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत कोकण अधिक खुलून दिसतो. त्यात सकाळचे दाट धुके असल्याने अवकाशात आल्यासारखे वाटते. तसेच गावच्या वाटा, डोंगर व रस्त्ये धुक्यामुळे झाकले जातात. तेव्हा केव्हा एकदा सकाळ होते आणि चुलीची धग घेतो असे रात्री थंडीची हुडहुडी भरणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी कोकणातील कडाक्याची गुलाबी थंडी आणि चुलीचा धग घेण्यासाठी जरूर हिवाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकंती करायला या. अलीकडच्या काळात पर्यटक नाताळच्या सुट्टीत गोव्याला जाण्याऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिक पसंती देतात. कोकणात हिवाळ्यात आल्यावर कशी थंडगार आणि बोचरी गुलाबी थंडी लागते आणि कशाप्रकारे पेटलेल्या चुलीच्या धगाचा आसरा स्थानिक नागरिक घेत असतात हे आल्यावरच पाहायला मिळेल. त्याची मजा काही कोकणात वेगळीच असते. त्यासाठी निसर्गरम्य कोकणात थंडीच्या दिवसात यावे लागेल. त्याच वेळी समजेल की, ज्यावेळी दातावर दात आपटतात तेव्हा गुलाबी थंडी कशी असते याचा प्रत्ययास पाहायला मिळेल. तसेच बोचरी थंडी कशी असते हे सावंतवाडी तालुक्यातील अत्यंत सुंदर व निसर्गरम्य पर्यटन असणाऱ्या आंबोली गावी गेल्यावर अनुभवता येईल. त्याचमुळे देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर करण्यात आला. सध्या पर्यटकांचा वाढता कल सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येतो. त्यासाठी सरकारने पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अधिक लक्ष दिले पाहिजे.
नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुलाबी थंडी आणि चुलीचा धग याचे अतूट नाते आहे. आता जरी चुलीची जागा गॅसने घेतली तरी आजही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चुलीचे अस्तित्व टिकून ठेवले आहे. त्यामुळे पर्यटक खानावळीत जेवायला गेल्यावर चुलीवरच्या जेवणाला अधिक पसंती देतात. सध्याच्या युगात जेवणाचे पार्सल जरी घरी आले तरी आजही चुलीचे अस्तित्व अबाधित आहे आणि उद्याही अबाधित राहणार आहे. हीच खरी कोकणची ओळख आहे. चुलीवरच्या जेवणाची चवच काही भारी असते. त्यामुळे पर्यटक जास्त आकर्षित होत असतात. तसेच चाकरमानी आपल्या जिल्ह्यातील गावी आल्यावर जुने ते सोने म्हणत जरी ओली लाकडे असली तरी चुलीत आग पेटवून जेवण करतात.
बऱ्याचवेळा ग्रुपने जिल्ह्यात नागरिक एकत्र येतात. गारठ्यात थंडीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटविली जाते. काहीवेळा जिल्ह्यातील शाळेतील मुलांचे शिबीर याच मोसमात आयोजित केले जाते. त्यावेळी सुद्धा मुले थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आसपासची सुखी लाकडे गोळा करून रात्रीची शेकोटी पेटवून धग घेत असतात. अशा वेळी मुलांची करमणूक म्हणून मुलांचे दोन ग्रुप तयार करून गाण्यांच्या भेंड्या सुद्धा लावल्या जातात; परंतु शेकोटीपेक्षा चुलीच्या धगाची काही वेगळीच मजा असते. थंडीमध्ये चुलीतील धगाने आपण गरम शेक घेतो. गारठलेले पायाचे तळवे धगावर शेकले जातात. त्यामुळे पायांना ऊब मिळते. तसेच चुलीतील धगावर हाताचे तळवे गरम करून आपल्या गालाला लावले जातात. त्याची मजा काही औरच असते. अशा घटना जीवनात कधीही विसरू शकत नाही. एक प्रकारे चुलीतील धग ऊर्जा देत असतो. त्यातून आपल्याला बरेच काही तरी शिकता येते. इतकी ताकद चुलीतील धगामध्ये आहे.
कडाक्याच्या थंडीत आम्ही भावंडे लहान असताना आयेन (आई) चुलीत धग पेटवल्यान काय हळूच अंगाभोवती गोधडी गुंडाळून धगाक बसायचो. नंतर लाकडा जळाक लागली काय आये म्हणायची मागे बसा. किटाळ उडात…! इतकी काळजी आये घ्यायची. त्यासाठी वडील आदल्या दिवशी लाकडाचे भेतळे फोडून ठेवत असत. तेव्हा धग थंडीसाठी रामबाण उपाय आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. धगामुळे कोणत्याही प्रकारची पायाला फूट लागत नाही किंवा पायाचे गुडघे दुखत नाही. सध्याच्या युगात धगापासून तरुण मंडळी दूर जात असल्याने गुडघे दुखी अधिक प्रमाणात जाणवत आहे. तेव्हा थंडीच्या दिवसात चाकरमानी कधीही गावाक इलो काय सकाळी उठल्यावर मागच्या पडवीत मडक्याखाली आग घातलेली असते त्याच्या धगाक जाऊन आंगमास शेकताना दिसता. तोच नंतर दुपारी सांगता मुंबईक फेनाची हवा घेऊन शरीरात हवा भरली आसा तेव्हा सकाळी सकाळी धग घेतल्यामुळे घाम इलो. अंग कसा कडक झाला. असे अनेक किस्से चाकरमानी मुंबईक जाईपर्यंत रंगू लागतात.
सध्या काही ठिकाणी कोकणातील थंडीतील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमी सुद्धा येत असतात. अनेक तरुण मंडळी आपल्या बाईकने कोकणातील डोंगरदऱ्या पाहण्यासाठी येतात. थंडीमुळे दाट धुके पसरलेले दिसते. त्यात रस्त्यावरील नागमोडी वळणे यात काहीवेळा धुक्यामुळे वाहन सोडा समोरील रस्ता सुद्धा दिसत नाही. त्यामुळे पुढे रस्ता हरवला काय असे मनात येते. मात्र तो लपवाछपवीचा डाव असतो. स्थानिक नागरिक लाल परीचा काळ सुखाचा म्हणत लालपरीने जाणे पसंत करतात. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणातील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आणि चुलीच्या धगाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवा.