नागपुर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे आमने सामने आले. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून त्या प्रश्नांना चांगली उत्तरे दिली.
परभणीचे प्रकरण, त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचे प्रकरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सभागृहात चांगलेच गाजले. यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला तर त्यावर बोलताना सत्ताधाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आज हिंदूत्त्वाचा मुद्दा चांगलाच गाजला. अबू आझमी यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता चिथावणीखोर भाषणांचा उल्लेख केला आणि धर्म आणि महापुरुषांविरोधात होणाऱ्या भाषणांविरोधात कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच देशात ऐक्य टिकवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आक्रमक होत अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणे द्यायची वेळ आली नसती, असा टोला लगावला.
अबू आझमी यांनी चिथावणीखोर भाषणांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, अध्यक्ष महोदय मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो की, तुम्ही एका असा कायदा आणा की, जर कुणी कुठल्या धर्माविरोधात, महापुरुषांविरोधात काही बोललं तर त्याला जामीन मिळता कामा नये. तो किमान दोन-चार वर्षे तुरुंगात राहावा आणि किमान त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा व्हावी. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भाईचारा असणं आवश्यक आहे. हिंदू-मुस्लिमांमधील नाते तुटले तर भारत तुटेल. त्यामुळे धर्माविरोधात बोलणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल, असा कायदा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज द्यावे. असे केल्यास महाराष्ट्रामधील ५० टक्के कायदा आणि सुव्यवस्था दुरुस्त होईल. एक साहेब सांगतात मशिदीत घुसून मारेन, अरे का मारणार, आमची काय चूक आहे. कुराण वाचू देणार नाही, स्पीकर बंद करणार, अध्यक्ष महोदय, हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. आपापसात मिळून राहणारा देश आहे, असे अबू आझमी यांनी सांगितले, त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना तिथेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
अबू आझमी जे भाईचारा वगैरे बोलताहेत तसे काही नाही आहे. ते चुकीची माहिती देत आहेत. ते दुसरी बाजू समजून घेत नाही आहेत. आधी गणेश मिरवणुकीवर दगड कोण मारणार, आमची मंदिरे कोण तोडणार. अबू आझमी यांनी भाईचाऱ्याची ही शिकवण जर फतवे काढणाऱ्यांना दिली असती तर आज अशी भाषणे द्यायची वेळ आली नसती. -नितेश राणे