इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धबंदी झाली. मात्र ती काही तासच टिकली. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होणार नाही, असे जाहीर केले; प्रत्यक्षात मात्र रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. दोन-तीन वर्षे असे युद्ध चालू राहते आणि त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतात. आणखी किती काळ जगाने युद्धाच्या झळा सहन करायच्या, हा प्रश्नच आहे.
आरिफ शेख
लेबनॉन आणि इस्रायलमध्ये दीर्घकाळ चाललेल्या तणावानंतर अखेर युद्धविराम झाला. लेबनीज सरकारने या कराराला मान्यता दिली आणि त्याला ‘हिजबुल्लाह’सह सर्व लेबनीज गटांची संमती मिळाली. इस्रायलच्या मंत्रिमंडळानेही २६ नोव्हेंबर रोजी या युद्धविरामाला मंजुरी दिली आणि २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला; पण युद्धबंदीच्या २४ तासांमध्ये इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव पुन्हा वाढला. इस्रायलने २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये ‘हिजबुल्लाह’ने वापरलेल्या लाँचरवर हवाई हल्ला केला. इस्रायलकडून या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दक्षिण लेबनॉनच्या काही भागात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. इस्रायलचे म्हणणे आहे की हे लोक युद्धविराम कराराचे उल्लंघन करत होते; २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू झाला. यानंतर लेबनीज आर्मीवर अनेकदा युद्धविराम तोडल्याचा आरोप करण्यात आला. युद्धबंदी किती नाजूक आहे, हे या आरोप-प्रत्यारोपांवरून स्पष्ट होते. युद्धबंदीच्या अटींनुसार, इस्रायली सैन्याला दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्यासाठी साठ दिवस लागतील; परंतु या कालावधीत कोणतीही बाजू आक्रमक कारवाई करणार नाही. लेबनॉनमधून रॉकेट हल्ल्यांमुळे उत्तर इस्रायलमधील लोक विस्थापित झाल्यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘हिजबुल्लाह’विरुद्ध ही कारवाई केली. तथापि, उत्तर इस्रायलमधील सुमारे साठ हजार लोक अजूनही आपल्या घरी परत येऊ शकलेले नाहीत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार ‘हिजबुल्लाह’ने कराराचे पालन केले तरच ते आपले सैन्य मागे घेतील. नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आपण युद्धविरामाचे उल्लंघन केले, तर पुढील कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
युद्धबंदीनंतर दोन्ही देशांमधील हिंसाचाराची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. लेबनॉनने ऑक्टोबर २०२३ मध्ये हिंसाचार सुरू केला. हमासने गाझामधून हल्ला केल्यानंतर ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर रॉकेट, ड्रोन आणि मिसाईल डागण्यास सुरुवात केली. इस्रायलने हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले आणि नंतर सप्टेंबरच्या मध्यात युद्ध मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. गाझामधील युद्ध अजूनही सुरू आहे आणि त्याचा शेवट दृष्टिपथात नाही. लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली गोळीबारात लेबनॉनमध्ये तीन हजार ७६०हून अधिक लोक मारले गेले. या लढाईमध्ये इस्रायलमधील सत्तरहून अधिक लोक मारले गेले. त्यापैकी अर्ध्याहून अधिक नागरिक होते, तसेच दक्षिण लेबनॉनमध्ये लढणारे डझनभर इस्रायली सैनिक होते. नेतन्याहू यांनी युद्धबंदीची तीन कारणे दिली आहेत. इराणवर लक्ष केंद्रित करणे, इस्रायली सैन्याला श्वास घेण्यास आणि साठा भरून काढण्यासाठी वेळ देणे आणि हमास-हिजबुल्लाहला वेगळे करणे. संयुक्त राष्ट्राने इस्रायलच्या हल्ल्यांना नरसंहार म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून माघार घेण्याचे आवाहन केले आहे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने नेतन्याहूविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे; मात्र असे असतानाही इस्रायलने गाझामध्ये आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत.
लेबनॉनसाठी ताज्या युद्धबंदीला मोठे महत्त्व होते. युद्ध सुरू होण्यापूर्वीच लेबनॉनची अर्थव्यवस्था खूपच कमकुवत होती. आता अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संकटात आणखी वाढ झाली. शिवाय, युद्धाने लेबनॉनमध्ये सांप्रदायिक तणाव पुन्हा जागृत केला आहे. लेबनॉनमध्ये विविध गटांमध्ये तणाव, संघर्षाची परिस्थिती आहे. इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी लेबनॉनमधील कोणताही गट ‘हिजबुल्लाह’ला आव्हान देण्याच्या स्थितीत नव्हता; पण आता परिस्थिती बदलली आहे. ‘हिजबुल्लाह’ची लष्करी शक्ती कमकुवत झाली असून त्याचा नेता नसराल्लाह मारला गेला आहे. लेबनॉनमध्ये दोन वर्षांपासून अध्यक्ष नाही. नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती त्यांच्या मित्रपक्ष असण्याच्या अटीवर केली होती. आता लेबनॉनच्या नेत्यांनी नवीन अध्यक्षांच्या नावावर सहमती दर्शवली पाहिजे, जो नवीन पंतप्रधान आणि सरकार नियुक्त करेल.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने नवे वळण घेतले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या मित्रराष्ट्रांना एक इशारा दिला आहे. यामुळे युरोपपासून इंग्लंडपर्यंत मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. हे देश पुतीन यांचे लक्ष्य आहेत. युक्रेनला आण्विक शस्त्रे परत करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना पुतीन यांनी हा इशारा दिला आहे. या पावलामुळे जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा रशियाने केला. युक्रेनला अण्वस्त्रे मिळाल्यास त्याचे प्रत्युत्तर अत्यंत विनाशकारी असेल, असे रशियाने स्पष्ट केले आहे. पुतीन यांच्या योजनेनुसार, लंडन, बर्लिन, पॅरिस आणि रोम यासारख्या युरोपियन राजधान्यांवर हल्ले केले जातील. स्वीडन, फिनलंड, पोलंड आणि नेदरलँड यांसारख्या देशांवरही भयंकर हल्ल्यांची योजना आखण्यात आली. पुतीन यांनी पारंपरिक अण्वस्त्रांच्या पलीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या शस्त्रांचा उल्लेख केला आहे, ज्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, गुप्त लढाऊ विमाने, लांब पल्ल्याचे ड्रोन, थर्मल रेडिएशन शस्त्रे यांचा समावेश आहे.
पुतीन यांचा इशारा हलक्यात घेतला जात नाही. हा इशारा युरोपच नव्हे, तर अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रांसाठीही गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. रशियाची ही आक्रमक भूमिका संपूर्ण जगाला विनाशाकडे ढकलू शकते. पुतीन यांच्या इशाऱ्यानंतर ‘नाटो’ देशांमध्ये घबराट पसरली आहे. अमेरिकेने युद्धक्षेत्रात ‘मिनिटमॅन-३’ क्षेपणास्त्र सक्रिय केले आहे. जर्मनी आणि पोलंडमध्ये संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होत आहेत. अमेरिकेने आपली अण्वस्त्रे अपग्रेड करण्यासाठी १३८ अब्ज डॉलर (११ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त बजेट मंजूर केले आहे. अलीकडेच रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करून त्या देशाचा वीजपुरवठा खंडित केला. या हल्ल्यांमध्ये रशियाने ९१ क्षेपणास्त्रे आणि ९७ ड्रोन्सचा वापर केला. युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांना अंधारात राहणे भाग पडले. रशियाने या हल्ल्याचे वर्णन युक्रेनने अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांच्या वापरास प्रत्युत्तर म्हणून केले आहे. ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी सक्षम आहेत. अलीकडेच युक्रेनने रशियन प्रदेशांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला होता. पुतीन यांनी या हल्ल्यांना ‘पाश्चात्य शस्त्रांचा धोकादायक वापर’ म्हटले आणि रशिया जोरदार प्रत्युत्तर देईल असे सांगितले.
हल्ल्यापूर्वी पुतीन यांनी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे पत्रकार परिषदेत सांगितले, की रशिया युक्रेनच्या ‘निर्णय केंद्रांवर’ आणि कीव्हवर नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्याचा विचार करू शकतो. रशियाने युक्रेनचे ऊर्जा ग्रीड आणि इंधन साठवण सुविधांवर हल्ला केल्यानंतर काही तासांमध्येच ही धमकी आली आहे. रशियन हल्ल्यांनंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’चे सरचिटणीस, ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर आणि जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासह अनेक पाश्चात्य नेत्यांना मदतीचे आवाहन केले. आमच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हा केवळ युक्रेनवरील हल्ला नाही तर संपूर्ण जगाच्या शांतता प्रयत्नांवर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचे रूपांतर आता नव्या आणि घातक शस्त्रांच्या शर्यतीत झाले आहे. युक्रेन पाश्चात्य शस्त्रांचा वापर करत असल्याचा दावा रशियाने केला आहे.