डोंबिवली : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील परप्रांतीय अखिलेश शुक्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून या मारहाण प्रकरणी इतर दोन जणांना देखील ताब्यात घेतले असून याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची एसीपीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
कल्याणच्या योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाण प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून यातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबीयांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून अन्याय वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या शिष्टमंडळाने केला आहे. त्याची दखल घेत कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही झेंडे यांनी दिला आहे.
शुक्ला हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना अटक करण्याचे काम सुरू असून ८ ते १० जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.