जयपूर:राजस्थानच्या जयपूरमध्ये आज, शुक्रवारी पहाटे झालेल्या टँकर स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढलीये. हा मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. तर या अपघातात ३५ जण गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेत १४ जण अद्याप बेपत्ता आहेत.
जयपूरच्या भांकरोटा येथे हा भीषण अपघात घडला. यामुळे हा संपूर्ण परिसर हादरून गेला.दिल्ली पब्लिक स्कूलजवळ एलपीजी टँकर आणि ट्रकची धडक होऊन भीषण स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण होरपळले आहेत. अपघातानंतर बसमधील १४ प्रवासी आणि चालक-कंडक्टर बेपत्ता आहेत. आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जयपूर पोलिसांनी दिली आहे.
या आगीत ३७ वाहने जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये बस, ट्रेलर, ट्रक, कार आणि मोटारसायकल यांचा समावेश असून वाहनांची माहिती मिळण्यासाठी पोलिसांनी 9166347551, 8764688431, 7300363636 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. एलपीजी टँकर अजमेरहून जयपूरला येत होता. टँकर डीपीएस शाळेजवळ यू-टर्न घेत असताना जयपूरकडून येणाऱ्या ट्रकने टँकरच्या नोझलला धडक दिली. नोझलमधून सुमारे १८ टन गॅस पसरला आणि २०० मीटरच्या त्रिज्येत एक गॅस चेंबर तयार झाला. काही सेकंदातच टँकरमध्ये मोठा स्फोट झाला, त्यामुळे जवळपासच्या वाहनांना आग लागली. स्फोट एवढा जोरदार होता की आगीच्या ज्वाळांनी आकाश गाठले. घटनास्थळी उभ्या असलेल्या स्लीपर बसमध्ये ३४ प्रवासी होते. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून २० जण गंभीर भाजले आहेत. त्याचवेळी आगीत अनेक पक्षी जळून खाक झाले. स्फोटानंतर परिसरात ६ तास श्वास गुदमरल्यासारखे आणि डोळ्यात जळजळ झाल्याचे जाणवत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात मोठे नुकसान झाले परंतु, घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील कच्च्या तेलाची पाइपलाइन सुरक्षित आहे.