सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर व धर्म ह्यांची चुकीची सांगड घालून आजपर्यंत सर्व युद्धे झालेली आहेत व यापुढे होत राहतील. दहशतवाद हा त्याचाच एक प्रकार आहे. हे जर व्हायला नको असेल तर परमेश्वर हा विषय समजला पाहिजे. आज प्रचलित असलेल्या धर्मांचा पाया काय आहे ? हा पाया एकच आहे तो म्हणजे परमेश्वर कृपा करतो किंवा कोप करतो. परमेश्वर कृपा करत नाही व कोपही करत नाही हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. परमेश्वर कृपा करतो किंवा कोप करतो ही समजूत एकदा पक्की झाली की कृपा होण्यासाठी काय केले पाहिजे व कोप टाळण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला. अगदी सोपे आहे ते म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करून घेतले की त्याची कृपा होईल आणि त्याचा कोप टाळण्यासाठी विशेष काहीतरी केले पाहिजे असेच जगांत चाललेले आहे. एका धर्मातील लोकांनी दुसऱ्या धर्मातील लोकांना मारणे हे सुद्धा पुण्य समजले जाते. हे पुण्य का समजले जाते कारण त्यांचा समज असा आहे की त्यांचा परमेश्वर खरा व दुसऱ्यांचा परमेश्वर खोटा. आमचा परमेश्वर तुमच्यावर कृपा करील म्हणून आमच्या धर्मात तुम्ही या नाहीतर तुम्ही जिवंत राहायला योग्य नाही अशा समजुतीमुळे धर्माच्या नावांखाली युद्धलढाया, दंगेधोपे, धर्मांतर असे अनिष्ट प्रकार सुरु झाले.
एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे की माणूस हा परमेश्वराच्या खिजगणतीत नाही. माझे हे शब्द नीट लक्षांत घ्या, “माणूस हा प्राणी परमेश्वराच्या खिजगणतीत नाही”. ढेकूण आपल्या खिजगणतीत आहे का? पायाखाली किती मुंग्या मेल्या, किती कीटक मेले. आपणच विठ्ठल विठ्ठल असे टाळ्या पिटून करत असताना किती जंतू मेले ह्याची खिजगणती आहे का?
सांगायचा मुद्दा असा की आपण परमेश्वराची भक्ती करतो तेव्हा आपल्याला परमेश्वरच जर समजला नाहीतर तो धर्म कसला व ती भक्ती कसली? तो धर्मही चुकतो, भक्तीही चुकते आणि उपासनाही चुकते, सगळेच चुकते. धर्म कशाला म्हणतात? शहाणपण हा धर्माचा प्राण आहे. शहाणपण नसेल तर धर्म म्हणजे प्रेत, धर्म म्हणजे राख. हे शहाणपण कशांत आहे? पहिले शहाणपण हे परमेश्वराला समजून घेण्यांत आहे. परमेश्वर काय करतो? परमेश्वर काहीच करत नाही. परमेश्वर काहीच करत नाही पण तो आहे म्हणून सगळे चाललेले आहे.
ह्यासाठी मी कितीतरी दृष्टांत दिलेले आहेत. सूर्य, इलेक्ट्रिसिटी, हवा, गुरुत्वाकर्षणशक्ती अशी अनेक उदाहरणे मी दिली. हे सर्व आहेत म्हणून जग चाललेले आहे. ह्या सर्वांपेक्षा जो सूक्ष्म आहे, ह्या सर्वांपेक्षा जो दिव्य आहे, तो आहे म्हणून हे सर्व चाललेले आहे. “तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे”.चाले हे शरीर कोणाचिया सत्ते, सत्ता म्हणजे असणे. खरा अर्थ असा आहे की सत्ता म्हणजे सातत्याने असणे म्हणजेच सत्य, सत्ता. त्यामध्ये शक्ती ही असते. इलेक्ट्रिसिटीच्या नुसत्या अस्तित्वाने अनेक गोष्टी चाललेल्या असतात. त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये शक्तीपण आहे तशी ही चैतन्यशक्ती. खरा परमेश्वर हाच आहे. सचिदानंद स्वरूप चैतन्यशक्ती हाच खरा परमेश्वर आहे. हा परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही व कुणावरही कोप करत नाही ही गोष्ट एकदा लक्षांत ठेवली की नवस कसले आणि कृपा होण्यासाठी अमुक केले पाहिजे हे सगळेच गेले. ह्या एका सिद्धांताने सगळी कर्मकांडे गळून पडतात.