Sunday, October 26, 2025
Happy Diwali

R Ashwin Retirement : रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीवर सुनील गावस्कर भडकले

R Ashwin Retirement : रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीवर सुनील गावस्कर भडकले

मुंबई : रवीचंद्रन अश्विनने सामना संपल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण अश्विनने तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच नेमकं काय घडलं हे सुचलं नाही. रविचंद्रन अश्विनने घेतलेल्या या निर्णयावर आता माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेताना सर्वांत मोठी चूक केली, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मांडले आहे. अश्विनने तिसरा कसोटी सामना संपल्यावर आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करून सर्वांनाच चकीत केले. भारत-ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.अश्विनच्या या निर्णयावर सुनील गावस्कर म्हणाले की," जर अश्विनला निवृत्ती घ्यायची होती, तर त्याने निवड समितीला असे सांगायला हवे होते की, या दौऱ्यानंतर मी निवडीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. अश्विनने तिसरा सामना संपल्यावर निवृत्ती घेत चूक केली आहे, असे मला वाटते. कारण या दौऱ्यात सिडनीच्या मैदानात अजून एक सामना होणार आहे. या मैदानात फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते. त्यामुळे या कसोटीनंतर अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला असता तर ते उचित ठरले असते, असे मला वाटते. कारण या सामन्यासाठी अश्विनला खेळण्याची संधी मिळाली असती. कारण खेळपट्टी पाहून संघ निवडला जातो, त्यामुळे सिडनीत कदाचित अश्विनला संधी मिळाली असती. पण अश्विनने तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती जाहीर करत आपली सर्व दारं बंद करून टाकली आहेत. "

पुढे बोलताना गावस्कर म्हणाले की, " एखाद्या दौऱ्यासाठी जेव्हा निवड समिती आपाल संघ निवडते, तेव्हा त्यामागे त्यांचा काही तरी विचार असतो. प्रत्येक खेळाडूची निवड काही गोष्टी डोळ्यापुढे ठेवून केली जात असते. जर खेळाडूंना दुखापत झाली तर कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, हादेखील एक विचार करावा लागतो. " आर अश्विनची जागा वॉशिंग्टन सुंदर मिळेल का? असा प्रश्न विचारल्यावर सुनील गावस्कर म्हणाले की “मला वाटते की वॉशिंग्टन सुंदर त्याच्या पुढे आहे. अश्विनने तडकाफडकी निवृत्ती निर्णय ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. तिसरा सामना संपल्यावर लगेच अश्विनने निवृत्ती जाहीर करत असताना निवड समितीलाही माहिती दिली नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळेच अश्विनच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

Comments
Add Comment