Wednesday, March 26, 2025
HomeदेशRahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी राहुल यांच्याविरोधात केस दाखल केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या ११७,१२५,१३१,३(५) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य काही खासदारांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये आणखी पाच कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती. त्यामध्ये कलम 115 (जाणूनबुजून दुखापत करणे), कलम 117 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे), कलम 121 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्यासाठी दुखापत करणे), कलम 351 (धमकावणे) आणि कलम 125 (दुसऱ्यांची सुरक्षा धोक्यात टाकणे) या कलमांचा समावेश आहे.

काय आहे पार्श्वभूमी

संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत भाजप खासदार मुकेश राजपूत आणि प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे राजपूत यांचा तोल जाऊन ते अंगावर पडल्यामुळे राजपूत आणि सारंगी दोघेही जखमी झाल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी घडली.

या संदर्भात भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले की, मी संसद भवनाच्या पायऱ्यांजवळ उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यामुळे राजपूत तोल जाऊन प्रताप सारंगी यांच्या अंगावर पडल्यामुळे आपण जखमी झाल्याचे सारंगी यांनी सांगितले. राहुल यांनी धक्का दिल्यामुळे मुकेश राजपूत कोसळल्याने वयोवृद्ध असलेले प्रताप सारंगी खाली कोसळले. या घटनेत प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे प्रत्यक्षदर्शी खासदाराने सांगितले. दरम्यान पंजाबच्या फरूखाबादचे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी घटनेची निंदा करत आजचा दिवस संसदीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान राहुल गांधी हे विरोधी पक्षनेतेपदाच्या लायकीचे नसल्याचे विधान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. एका आदिवासी महिला खासदाराशी त्यांची वागणूक अशोभनीय असल्याची टीकाही चौहान यांनी केली आहे. संसदेच्या मकर दरवाजावर भाजप खासदारांचे आंदोलन सुरू असतानाच ते तिथे आले. एका बाजूने त्यांना जाण्यासाठी जागा असतानाही भाजप खासदारांमध्ये ते घुसल्याचा आरोपही चौहान यांनी केला आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडूनही भाजप खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच भाजप खासदारांच्या हातात काठ्या होत्या, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात चळवळ उभी करणार असल्याचे खर्गे यांनी पत्रकार परिषद म्हटले आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी दोन्ही खासदारांशी फोनवर बोलून त्यांची प्रकृती जाणून घेतली.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना कुस्ती दाखवायची काय गरज आहे. इतरांना मारण्यासाठी ते कराटे शिकले आहेत का? दरम्यान भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -