Sunday, August 31, 2025

कृष्णार्पण

कृष्णार्पण

प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

भक्त परमेश्वराला संपूर्णपणे शरण जातो, त्याच्याशी एकरूप होतो. ही सर्वश्रेष्ठ अवस्था होय. अशा भक्ताच्या हातून एखादं निषिद्ध कर्म घडलं. तर? तरीही त्याला दोष लागत नाही. याचं कारण ‘मी’ कर्म केलं असं तो मानत नाही. ‘मी’पण नाहीसं झालेल्या त्याने, ती ईश्वराला अर्पण केलेली असतात. हा विषय मांडणाऱ्या या ओव्या अठराव्या अध्यायातील. ‘परंतु महानदी किंवा रस्त्यातले घाणेरडे पाणी, यांना गंगेचा संबंध झाला म्हणजे जशी ती गंगारूप होतात, तसा माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला शुभ किंवा अशुभ कर्माचे दोष लागत नाहीत.’ ही ओवी अशी – ‘परी गंगेच्या संबंधीं। बिदी आणि महानदी। येक तेंवि माझ्या बोधीं। शुभाशुभांसी॥ ओवी क्र. १२५२

‘बिदी’ या शब्दाचा अर्थ आहे नाला. शुभ कर्म ही महानदीप्रमाणे, तर अशुभ कर्म ही नाल्याप्रमाणे होत. गंगेचा संबंध आला म्हणजे ती दोन्ही गंगारूप होतात. ईश्वर हा पवित्र, कल्याणकारी म्हणून तो गंगेप्रमाणे भक्ताचे कर्मदोष दूर करणारा. पुढील दाखला दिला आहे तो असा - ‘अथवा मलयगिरी चंदन आणि दुसरे रायवळ लाकूड हा भेद तोपर्यंतच असतो की, जोपर्यंत त्यांचा अग्नीशी संबंध झाला नाही.’ ओवी क्र. १२५३ शुभ कर्माला दिली आहे चंदनाची उपमा. ते स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देतं. त्याप्रमाणे चांगली कर्मं असतात. ती करणारा स्वतः कष्ट घेतो, इतरांना आनंद देतो. अशुभ कर्माला दिली आहे रायवळ लाकडाची उपमा, जे नुसतं जळतं. परमेश्वराच्या तेजाला अग्नीची उपमा दिली आहे. अग्नीत जे काही घालू, ते त्यात लय पावतं. त्याप्रमाणे सर्व कर्मं परमेश्वरी सामर्थ्याने विलीन होतात. आता यानंतरचा दृष्टान्त बघा ‘किंवा पाच कसाचे अथवा सोळा कसाचे सोने हा भेद सोन्यामध्ये तोपर्यंतच असतो, जोपर्यंत परिसाशी संबंध आला नाही! ओवी क्र. १२५४ ‘त्याप्रमाणे शुभ आणि अशुभ हा भेद तोपर्यंतच असतो की, जोपर्यंत सर्वत्र माझा प्रकाश झाला नाही.’ ओवी क्र. १२५५ पाच कसाचे सोने म्हणजे अशुभ तर सोळा कसाचे म्हणजे शुभ कर्म होय. पाचकशी सोन्याला काही तेज नसतं. याउलट सोळाकशी सोनं हे लखलखीत, शुद्ध असतं. पण परिस स्पर्शाने त्यांच्यातील हे भेद गळून जातात. त्याप्रमाणे परमेश्वराचा परिस स्पर्श आहे. नदी, नाला आणि गंगा हा एक दाखला. चंदन, साधं लाकूड आणि अग्नी हा दुसरा दाखला. हिणकट सोने, शुद्ध सोने आणि प्रकाश हा तिसरा दृष्टान्त आहे. ज्ञानदेवांनी दिलेले हे एकापेक्षा एक असे सुरस व सरस दृष्टान्त आहेत. यातून ज्ञानदेव सांगतात, अनन्यभावाने परमेश्वराशी एकरूप होणाऱ्या भक्ताविषयी. त्याने आपली सर्व कर्मं ईश्वराला अर्पण केलेली असतात. हीच तर ‘आहे गीतेची शिकवण.. करा कर्म कृष्णार्पण.’

manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment