Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमहाराष्ट्र मंत्रिमंडळात कोकण!

महाराष्ट्र मंत्रिमंडळात कोकण!

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम, उदय सामंत, अशा पाचजणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात सत्ता महायुतीची आहे. यामुळे कोकणच्या विकासाला असलेला बॅकलॉग तर निश्चितच भरून निघेल.

संतोष वायंगणकर

महाराष्ट्राच्या इतिहासात रविवारी १५ नोव्हेंबरला दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्याचा राजकीय इतिहास आहे. या वेळच्या नागपूरला हिवाळी अधिवेशनातील पूर्वसंधेला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. या राज्य मंत्रिमंडळात नव्या-जुन्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वच विभागांना संधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी यानिमित्ताने समतोल राखण्याचा प्रयत्न निश्चितच केला आहे. ज्येष्ठांना नेहमीच वाटत राहाते आपला मान राखला गेला पाहिजे. पक्ष नेतृत्वाने आपला विचार करायला हवा. असे असले तरीही शेवटी वर्षानुवर्ष लाल दिव्यासोबत असणाऱ्यांनी कधीतरी हा देखील विचार करण्याची आवश्यकता असते. मग इतरांना, तरुणांना संधी केव्हा मिळणार? त्यामुळे ज्यांना अन्याय वाटतो त्यांच्यावरचा तो अन्याय नसतो, तर नंतर मिळणारी ती संधी असते. राजकारणात तर हे होतच असते. जे संयमाने राहतात, वागतात कोणतेही रिअँक्शन देत नाहीत, ते पुढे जात राहतात. संयमीपणाने त्यांना आपोआप संधी मिळत जाते. ज्यांना संयमी राहणं कळतं आणि जमतं ते निश्चितच आपोआप खूप पुढे जात राहतात.

यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणला चांगली संधी प्राप्त झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम, उदय सामंत, अशा पाचजणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. यातील चार कॅबिनेट मंत्री आहेत, तर योगेश कदम राज्यमंत्री आहेत. कोकण विकासाचे सुनियोजन खूप सुंदर यानिमित्ताने रेखाटले जायला हवे आणि ते प्रत्यक्षात साकारले गेले पाहिजे. महाराष्ट्रात सत्ता महायुतीची आहे. सत्तेतील कोकणचा सहभागही मोठा आहे. साहजिकच कोकणच्या विकासाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढला गेला पाहिजे. कोकणातील या जनभावना आहेत. कोकणातील जनतेच्या विकासाच्या मोठ्या अपेक्षा असल्या तरी त्यात कोणतेही गैर नाही. या सर्वांकडून निश्चितच तसे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. कोकणातील जनतेने मोठा कौल हा महायुतीच्या बाजूने दिला आहे. कोकणातील पालघर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आ. भास्कर जाधव वगळता सर्वच जागी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. साहजिकच राज्य मंत्रिमंडळाचा देखील कोकणाला स्थान देण्यात आले आहे. कोकणचा विचार करण्यात आला आहे. भाजपाच्या १९९५ सालच्या मंत्रिमंडळात कोकणातील विद्यमान खा. नारायण राणे, रवींद्र माने, प्रभाकर मोरे, रामदास कदम असे मंत्री होते.

यावेळी कोकणातून निवडून आलेले मंत्रिमंडळात समावेश असलेले जसे पाचजण आहेत, त्याचबरोबर सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले आशीष शेलार हे देखील कोकणपुत्र आहेत. यामुळे खरं तर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कोकणचे सहा मंत्री असणार आहेत. यातील पाचजण हे कॅबिनेट मंत्री आहेत. यामुळे कोकणाच्या विकासाला गती प्राप्त होईल, असा विश्वास ठेवायला हवा. कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कोणते उद्योग आणावेत, कोणत्या व्यवसायांना चालना द्यावी, यावर चर्चा होणे आवश्यक आहे. कोकणातील जनतेचा उद्योग प्रकल्पांना होणारा विरोध कशामुळे होतोय. जनतेचा खरोखरंच विरोध आहे की, विरोधासाठी विरोध करणारे विरोधी पक्षीय याला विरोध करताहेत यावरही थेट जनतेशी बोलून, त्यांना विश्वासात घेऊन प्रयत्न करण्यात आले पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या मनातील भीती कसली आहे, त्यांना नेमकं काय हवंय याचा विचारही सत्ताधारी म्हणून करण्यात आला पाहिजे. यातूनच कोकणात विकास प्रकल्पाच्या बाबतीत जो राजकीय विरोध होत असेल त्याबाबतीत जनता सकारात्मक विचार करू लागेल.

कोकणातील जनतेचा विरोध हा निश्चितच राजकीय पक्षनेत्यांच्या चुकीच्या पद्धतीने होत आहे. आजवर प्रकल्पांना होणारा विरोध हा मतांच्या राजकारणातून होणारा विरोध आहे. प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनाही आपण विरोध का करतो हे सांगता येत नसे. यामुळेच हा प्रकल्पांना होणाऱ्या विरोधासाठीच विरोध हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधूनच विरोध कमी होईल… मंत्री म्हणून जरी काही नव्याने मंत्रीपदी विराजमान झालेले असले तरीही आमदार म्हणून त्यांना प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव उपयुक्त ठरणार आहे. आदिती तटकरे, उदय सामंत यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे. भरत गोगावले, नितेश राणे, योगेश कदम हे नव्याने मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश असलेले असले तरीही ते मंत्री म्हणून निश्चितच चांगल्या कामाने यशस्वी होतील, यात शंकाच नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पंचवीस – तीस वर्षांपूर्वी एखादा राज्यमंत्री असायचा. कॅबिनेट मंत्रीपदाची संधीही फार कमी वेळा मिळाली आहे. तीस वर्षांपूर्वीचे ते चित्र आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळात पाच – पाच कोकण पुत्रांना असलेली संधी निश्चितच कोकणवासीयांना आनंद देणारी आणि कोकणवासीयांना अपेक्षा वाढवणारी आहे. कोकणाच्या विकासाला असलेला बॅकलॉग तर निश्चितच भरून निघेल. मात्र विकासाच्या दिशेने वाटचाल होत असताना तातडीने काय होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोकणातील भरकटणाऱ्या तरुण पिढीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन झाले पाहिजे.

एकीकडे कोकणच्या विकासाचा गतिमानतेचा विचार करत असताना सक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे. वेगळ्या विश्वासाने तिची वाटचाल व्हायला हवी. या सर्वांविषयी अधिक जागृकता असणे हे देखील निश्चितच काळाची गरज असणार आहे. कोकणातील या सर्व मंत्र्यांचे अभिनंदन करत असताना पुढील पाच वर्षांत कोकणात झालेला बदल दिसावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -