नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला.
Ajit Pawar : कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्यासाठी अजित पवारांचे केंद्राला पत्र
ओडिशाचे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी आणि फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत गुरुवारी सकाळी संसदेच्या मकरद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. प्रताप सारंगी मीडियासमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाजपा खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांनी इस्पितळात जाऊन त्यांची भेट घेतली. या प्रकरणी भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांनी बाजू मांडली. भाजपाच्या शिष्टमंडळाने संसद पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले आणि योग्य कारवाईची मागणी केली.
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
या प्रकरणावरुन संसदेत झालेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवार, २० डिसेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
कॉंग्रेसकडून ओम बिर्ला यांना पत्र
काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, के सुरेश आणि मणिकम टागोर यांच्यासह काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आरोप केला की, इंडिया ब्लॉकच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनी धक्काबुक्की केली. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदारांनी असा दावा केला आहे की, ते शांततेने निषेध करत होते. त्यानंतर पायऱ्यांवरुन संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलक खासदारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
———————————-