विलास खानोलकर
बाळप्पाला सुंदराबाई फार त्रास देत असे. त्यामुळे बाळाप्पा श्री समर्थांची सेवा सोडून मारुतीच्या देवळात जप करीत असे आणि त्रिकाळ श्री स्वामींच्या दर्शनास येत असे. एक वेळ सुंदराबाई म्हणाली, ‘महाराज, बाळाप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या देवळात जप करीत असतो. तेव्हा महाराज म्हणाले, ‘अगं, आपले भक्त हजारो कोसावर असले, तरी ते आपल्या जवळच आहेत.’ याचाच अर्थ असा की, सुंदराबाई आणि बाळाप्पा हे दोघेही श्री स्वामी समर्थांच्या सेवेत होते. येथे या दोघांच्या वृत्ती-प्रवृत्ती-मनोधारणा आणि आचार-विचार पूर्णतः भिन्न आहेत. त्यामुळेच त्या दोघांत वाकडेपणा आला. या वाकडेपणातूनच बाळाप्पा श्री स्वामींची सेवा सोडून मारुतीच्या मंदिरात आला. येथे मात्र तो श्री स्वामींची जपाच्या स्वरूपात सेवा करू लागला व नित्य नियमाने श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येऊ लागला.
येथे बाळाप्पा म्हणजे संसार-प्रपंचातील निवृत्तीचे प्रतीक आहे, तर सुंदराबाई पूर्णतः षड्रिपू लिप्ततेची प्रवृत्ती आहे. निवृत्ती ही देवाकडे वळते. याउलट षड्रिपूलिप्त प्रवृत्ती भोगाकडे वळते. तिला त्यापुढे साक्षात परमेश्वरही गौण-दुय्यम वाटतो. दृश्य स्वरूपातील सुखाकडेच तिचा अधिक ओढा असतो. याउलट दुसऱ्या टोकाचे आचरण निवृत्तीवाद्याचे असते. म्हणून बाळाप्पा आणि सुंदराबाई हे जणू काय दोन ध्रुवावर दोघे आहेत. निवृत्तीवादी बाळाप्पाचे षड्रिपू लिप्त प्रवृत्तीवादी सुंदराबाईशी भांडण होते. अखेरीस तो मारुतीच्या मंदिरात येतो. तेथे तो त्याच्या उपास्य दैवताचा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा जप करतो. त्रिकाल त्यांच्या दर्शनासही जातो. तो प्रत्यक्ष श्री स्वामींच्या जवळ जरी नसला, तरी त्याच्या हृदयमंदिरात श्री स्वामी स्थानापन्न झालेले होते. याउलट सुंदराबाई दृश्य स्वरूपात जरी श्री स्वामी सेवेत असली तरी तिला श्री स्वामींची फारशी पर्वा वाटत नव्हती; कारण ती मोह-मायेत आकंठ बुडालेली षड्रिपूंनी ग्रस्त होती.
सुंदराबाई जेव्हा बाळाप्पाला दूर जाऊन मारुतीच्या मंदिरात जप करीत असल्याचे सांगते तेव्हा एकप्रकारे ती बाळाप्पाचे उणेपण सांगून त्याच्याविषयी श्री स्वामींकडे तक्रारच करीत असते. तेव्हा श्री स्वामींनी दिलेले उत्तर, ‘अगं, आपले भक्त हजारो कोसांवर असले, तरी ते आपल्याजवळ असतात.’ अत्यंत मनोज्ञ व आपणांस विचार करावयास लावणारे हे गुरुवचन आहे. त्याचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला, तर मनोभावे बेंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या तळापासून सेवा करणारा त्याच्या उपास्य दैवतापासून कितीही दूर जरी असला, तरी तो उपास्य दैवताजवळच असतो. थोडक्यात म्हणजे निवृत्तीस्वरूप विरक्त बाळाप्पा देहाने जरी श्री स्वामी महाराजांपासून दूर गेल्यासारखा दिसत असला, तरी मनाने मात्र तो सदैव श्री स्वामी महाराजांपाशीच होता. म्हणूनच तर जो देवापासून विभक्त नसतो, त्यास भक्त म्हणतात. असा हा बाळाप्पा श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता.