श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षारक्षक दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करताना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. येथे सुरक्षारक्षक दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात मोठी चकमक(Encounter) झाली. यात ५ दहशतवादी ठार झाले. तर या चकमकीत २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर आता सुरक्षादलाचे जवान या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहेत. दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमधील ही चकमक कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएसच्या कद्देर गावात झाली. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारावर जवानांनी कुलगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जवानांना या ठिकाणी संशयित हालचाली आढळल्या. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारही केला. याला जवानांनी चोख प्रतुत्तरही दिले.
गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यात सुरक्षारक्षकांनी खोऱ्यामध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनचा वेग वाढवला आहे. दोन महिन्यांआधी २८ ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षारक्षत दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा जवानांच्या ताफ्यावर हल्ला जाला होता. यानंतर सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारे आणि दारूगोळा सापडला होता.