पुणे : राज्यातील प्रमुख कांदा बाजारात खरीप हंगामातील नवीन कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने व निर्यातीला पाहिजे. तेवढी चालना मिळत नसल्याने कांद्याच्या दरात प्रतिकिलोला दहा ते वीस रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील विविध बाजारात हे चित्र आहे. कांद्याचे बाजारभाव घसरल्याने चाकणसह राज्यातील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात नाशिक, पुणे जिल्ह्यातील चाकण, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक वाढत आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक सुमारे पन्नास हजार क्विंटलपर्यंत पोचली आहे. चाकण बाजारात सुमारे साडेसात हजार क्विंटलपर्यंत कांद्याची आवक पोचली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आवक सर्वसाधारण होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आवक वाढली आहे. यंदा पावसाने उत्तर महाराष्ट्रात तसेच पुणे जिल्ह्यात मोठा तडाखा दिल्याने कांद्याच्या प्रतवारीत मोठी घसरण झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परंतु कांद्याच्या भावात डिसेंबर महिन्यात घसरण झालेली दिसते आहे.
सोलापूर बाजार समितीत कांद्याला कमाल पन्नास रुपये प्रतिकिलोला तर सरासरी किमान वीस रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला. या बाजारात प्रतिकिलोला दहा ते तेरा रुपयाची घसरण झाली. नाशिकच्या लासलगाव, पिंपळगाव बसवंतच्या घाऊक बाजारात ही प्रतिकिलोला तेरा ते साडेचौदा रुपयांनी बाजारभाव कमी झाले, असे चाकण येथील कांदा व्यापारी व निर्यातदार प्रशांत गोरेपाटील, माणिक गोरे, जमीरभाई काझी, महेंद्र गोरे, विक्रम शिंदे, बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.