वॉशिंग्टन: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही. येथील विस्कॉन्सिनच्या मेडिसनमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडल. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये गोळीबार करणाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेत ६ जण जखमी झाले. पोलिसांनी गोळीबार कऱणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवलेली नाही. तसेच त्याने गोळीबार का केला याचाही अद्याप तपास लागलेला नाही.
मेडिसन पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी १०.५७ मिनिटांच्या सुमारास एबडंट लाईफ क्रिश्चियन शाळेत ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे अनेक जण जखमी झाले होते. मेडिसनमधील ज्या शाळेत ही गोळीबाराची घटना घडली त्या थाळेत किंडरगार्टनपासून ते १२ वीपर्यंत साधारण ४०० विद्यार्थी शिकतात.
अमेरिकेत दर दिवशी गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. यूएसमधील विविध शहरांमध्ये कधी एखादा माथेफिरू क्लबमध्ये घुसून फायरिंग करतो तर कधी एखाद्या शाळेमध्ये गोळीबाराची घटना घडते.