Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNagpur Metro : नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

Nagpur Metro : नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

* महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार

* नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार – मुख्यमंत्री

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार आज करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. त्यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महा मेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

Nilesh Rane : समुद्राची सुरक्षा वाऱ्यावर, गस्त घातली जात नाही; आमदार निलेश राणेंनी वेधले सरकारचे लक्ष

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

असा असणार मार्ग

दरम्यान, नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्यात आले आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील चार मार्गांचा अजून विस्तार करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -