Dhruv Consultancy Services Limited : ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड; पांडुरंग दंडवते

  35

पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यावर केंद्र सरकार गेल्या दहा-पंधरा वर्षांत खूप मोठा भर देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली रस्ते, पूल, बोगदे, मेट्रो रेल्वे, बंदर विकासाची काम वेगानं होत आहेत. पायाभूत सुविधांमुळे केवळ प्रवास वेगानं होतो असं नाही तर अधिक कनेक्टिव्हिटी, अधिक संधी आणि पर्यायाने अधिक विकास होत असतो. जागतिक स्तरावर पाहिलं तर अमेरिका, चीनसारख्या देशांमध्ये दळणवळणाची साधन खूप मोठ्या प्रमाणावर तसेच देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचल्यामुळे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुलभपणे जाण्याची संधी मिळते. रस्त्यांमुळे केवळ माणसांची ये-जा नाही तर मालवाहतूक सुद्धा सुलभ आणि वेगवान होते. ज्यामुळे उद्योग क्षेत्राची वेगाने भरभराट व्हायला ही मदत होते. हे लक्षात आलं साधारण २००० साली ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे पांडुरंग दंडवते यांना.


शिबानी जोशी


पांडुरंग दंडवते हे राज्य शासनाच्या एमएसआरडीसीमध्ये इंजिनीयर म्हणून काम करत होते. पूर्वी रस्ते, पूल बांधणी होत असताना सरकारी इंजिनीयरच त्यावर देखभाल करत असत, त्यामुळे रस्ते बांधणी क्षेत्रातला त्यांचा खूप मोठा अनुभव होता. संपूर्ण देशभरात रस्ते, पूल, बंदर बांधणीचं काम वेगाने सुरू झालं आणि या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी, दर्जा राखण्यासाठी, काम वेळेवर होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्याची गरज भासू लागली होती. त्यातूनच ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा  २००३ साली जन्म झाला. पांडुरंग दंडवते यांनी ही कंपनी स्थापन केली. गेल्या २१ वर्षांमध्ये, ध्रुव एक ब्रँड म्हणून विकसित झाला आहे आणि उत्कृष्ट रस्ते, पायाभूत सुविधा, पर्यावरण, सुरक्षिततेसाठी सल्ला देण्याचं काम करत आहे. कंपनी रस्ते, महामार्ग, पूल, कचरा व्यवस्थापन आणि बंदरे यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून, त्याची किंमत ठरवण्यापर्यंत तसेच कॉन्ट्रॅक्टर निवडीपासून, कामावर लक्ष ठेवणे तसेच रस्ता बांधून झाल्यावर त्याची देखभाल करणे अशी सर्व काम केली जातात.


डिझाइन सोल्यूशन्ससह, प्रकल्प व्यवस्थापन आणि गुणवत्ता नियंत्रणही त्यांची प्रमुख क्षेत्र आहेत. दंडवते यांनी सुरुवातीला चार कर्मचाऱ्यांसह एका भाड्याच्या जागेत कंपनी सुरू केली. आज त्यांच्याकडे ४०० प्रशिक्षित, उच्चशिक्षित कर्मचारी तसेच स्वतःचं ऑफिस उभं आहे. त्यांनी आतापर्यंत पाच हजार किलोमीटर लांबीच्या  रस्ते बांधणीसाठी सल्लागार म्हणून सेवा पुरवली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील रस्त्यांच्या बांधणीचा अनुभव मिळवल्यानंतर हळूहळू देशातल्या २९ राज्यांमध्ये रस्ते सल्लागार म्हणून ते काम करत आहेत. देशभरातल्या मोठमोठ्या दीडशेहून अधिक प्रकल्पांना त्यांनी सेवा पुरवली असून ९० प्रकल्प निर्माणाधीन आहेत. २१ वर्षांमध्ये देशातल्या विविध राज्यांत पाय रोवल्यानंतर त्यांना आफ्रिकेतल्या मोजॅम्बीक देशामध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आहे आणि इतर देशांमध्ये ही धृवच काम पोहोचत आहे. ध्रुव कन्सल्टन्सीने रस्ते मंत्रालयाच्या विविध नामांकित विभागांसाठी १७० हून अधिक प्रकल्पांवर काम केले आहे. NHAI, MoRTH अशा  रस्ते प्रकल्पांवर काम केले आहे. एखादा रस्ता बांधायचा ठरल्यावर त्याचा प्रकल्प अहवाल, कॉन्ट्रॅक्टर, त्याचं मूल्य आणि  सल्ला ध्रुवतर्फे दिला जातो. हे करत असताना प्रदूषण, पर्यावरणाचा विचारही केला जातो. एखादा रस्ता वन क्षेत्रातून जात असेल तर त्यासाठीच्या परवानग्या, एक झाड तोडायचं असेल तर त्याऐवजी झाड लावणं, त्याचं संगोपन अशा कामांसाठी सल्ला याचा समावेश असून त्यासाठीचे तज्ज्ञ मनुष्यबळ त्यांच्याकडे आहे.  मुंबई-दिल्ली सध्या रस्ते मार्गाने जाण्यासाठी २४ तास लागतात. ते अंतर १२ तासांत कापले जाईल अशा महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. त्यातील एका भागाचं काम करण्याची संधी ध्रुवला मिळाली. अमृतसर- भटिंडा, अमृतसर-जामनगर, त्रिसूर असे अनेक महामार्ग व महाराष्ट्र राज्यातले अनेक मार्ग त्यांनी मार्गी लावले आहेत.


केमिकल, आरोग्य, अन्नप्रक्रिया, स्टील, कृषी अशा उद्योगांपेक्षा अनेक पटीने सध्या पायाभूत सुविधा क्षेत्रात संधी  आहेत, त्याचा फायदा तरुण उद्योजकांनी घ्यावा असे दंडवते सांगतात. ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही ठिकाणी लिस्टेड आहे. धंदा वाढवायचा असेल तर भांडवलाची गरज असते. शेअर बाजारातून भांडवल मिळवण्याचे फायदेही खूप आहेत त्यामुळे कंपनी लिस्ट केली असे दंडवते सांगतात. अर्थात लिस्टेड झाल्यावर जबाबदाऱ्या येतात; परंतु मान्यता ही मिळते. ध्रुवसारख्या हजारो एसएमई कंपन्या भारतात काम करतात.


आपल्याला अदानी, अंबानी, टाटा, बाटा असे मोठे उद्योजक माहीत असतात; परंतु त्यांना वस्तू आणि सेवा पुरवण्याचं काम अशा कंपन्या करत असतात. देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये ४०% वाटा एमएसएमईचा आहे. त्यामुळे आपला स्वतःचा उद्योग उभारून देशाच्या विकासाला हे उद्योजक हातभारच लावतात असं दंडवते म्हणतात. स्टार्टअप, गतिशक्तीसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारही नवोद्योगी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी आणि देशांतर्गत उत्पादन निर्माण व्हायला मदतच होत असते. फर्स्ट जनरेशन उद्योग जेव्हा एखादा उद्योजक सुरू करतो त्यावेळी पुढे हा उद्योग कोण चालवणार? असा प्रश्न त्यांच्या मनात नेहमी असतो.


पांडुरंग दंडवते यांची उच्चशिक्षित कन्या त्यांच्या कंपनीमध्ये संचालक म्हणून रुजू झाली असून आठ वर्षांत तिने धडाडीचे निर्णय घेऊन कंपनीमार्फत मोठ मोठी कामही करून दाखवली आहेत. एखादा उद्योजक उद्योग व्यवसाय उभा करतो त्यावेळी त्यांनी पुढची फळी सुद्धा तयार ठेवावी तरच उद्योग फोफावू शकतो असं दंडवते आवर्जून सांगतात. उद्योग करताना पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करत असल्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लावण्याची तसेच प्रदूषण आणि पर्यावरणाचा विचार करत असल्यामुळे सामाजिक भान ही राखण्याची संधी मिळते याचा दंडवते यांना अभिमान असल्याच त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत.
joshishibani@yahoo. com

Comments
Add Comment

हवामान बदलाशी सामना : भारताचा ११ वर्षांचा चढता आलेख

भूपेंद्र यादव मानवनिर्मित हवामान बदलाचे परिणाम सध्या संपूर्ण जगभर जाणवू लागले आहेत. आंतरसरकारी हवामान बदल

आक्रमक सत्ताधारी अन् दिशाहीन विरोधक

महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकर आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या

नारीशक्तीची डिजिटल भरारी

सावित्री ठाकूर प्रगतीची नवी व्याख्या पूर्वी डिजिटल साक्षरता मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होती, मात्र तिची

पप्पा सांगा कुणाचे?

स्वाती राजे कित्येक वर्षं या बातमीने काळजात घर केलं होतं. ही मुलगी पुढे काय करेल? कशी राहील? कशी जगली असेल?

शुभांशूची अभिमानास्पद भरारी

अजय तिवारी गेल्या दोन-तीन दशकांमध्ये भारताचा अंतराळ कार्यक्रम त्याच्या आर्थिक प्रगतीमुळे ठळकपणे दिसू लागला.

युद्ध सरले, विजय कोणाचा?

अजय तिवारी इस्रायलने १३ जूनच्या रात्री इराणवर अचानक हवाई हल्ला केला. त्यामुळे पश्चिम आशियात एक नवे युद्ध सुरू