तबलावादनाला जगभरात वेगळी ओळख करून देणारे महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे हृदयाशी संबंधित समस्यांमुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात रविवारी निधन झाले. अनेकांना प्रसिद्ध घराण्याचा वारसा लाभलेला असतो. त्यापैकी काही जण वारसा पुढे नेतात. मात्र, झाकीर यांनी आपल्या वडिलांचा वारसा केवळ पुढे नेला नाही तर आपल्या घराण्यासह संपूर्ण देश आणि तबलावादनाला जगात वेगळी ओळख निर्माण करून दिली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात तबला या वाद्य प्रकाराचे नाव घेतले जाते तेव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे तबलावादन आणि लाईव्ह कॉन्सर्ट म्हणजे मेजवानीच असायची. तबल्यावर त्यांच्या बोटांमधून निघणारे सूर मनात रुंजी घालत असायचे. त्यांचे लाखो, करोडो चाहते आहेत. त्यांनी वादन केलेला तबला जो कुणी ऐकायचा त्या तबल्याची थाप ऐकणारा ‘वाह उस्ताद वाह’, असे म्हटल्याशिवाय राहत नव्हता. आता पुन्हा ती तबल्याची साथ ऐकायला मिळणार नाही म्हणून या तबला उस्तादाच्या निधनाने जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले आहेत.
७३ वर्षांचे अनमोल आयुष्य लाभलेल्या या तबला तपस्वीची जन्मभूमी मुंबई. त्यांच्या निधनाने मुंबईने एक अनमोल सुपुत्र गमावला. झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत माहीम येथे झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रख्खा हेसुद्धा सुप्रसिद्ध तबलावादक होते. उस्तादांचा उस्ताद अल्ला रख्खा आणि बिवी बेगम यांचे मोठे अपत्य म्हणजे झाकीर हुसेन. त्यांचे भाऊ, तौफिक कुरेशी आणि फझल कुरेशी हे देखील उत्कृष्ट तबलावादक आहेत. दुर्दैवाने त्यांचा आणखी एक भाऊ मुनव्वरचे लहान वयातच निधन झाले. मुंबईतील माहीम भागात असलेल्या सेंट मायकल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर झाकीर हुसेन यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याआधीच ते सेलिब्रिटी झाले होते. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी झाकीर हुसेन यांनी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट सादर केला आणि वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९७३ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या ‘ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्ट’मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.
ही समस्त भारतीयांसाठी मानाची गोष्ट होती. झाकीर हुसेन यांना अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत. तबला वादनातील अभूतपूर्व योगदानाबद्दल झाकीर यांना केंद्र सरकारतर्फे १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले होते. पुढे २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराचे ते मानकरी ठरले. १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी, इंडो-अमेरिकन संगीतातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. १९९२ मध्ये, त्यांना ‘प्लॅनेट ड्रम अल्बम’साठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या कारकिर्दीतील हा पहिला पुरस्कार होता. तेव्हा ते ४१ वर्षांचे होते. २००९ मध्ये त्यांच्या ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ अल्बमसाठी दुसरा ग्रॅमी मिळाला. याच वर्षी (२०२४) मिळालेले ३ ग्रॅमी पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील शेवटचे पुरस्कार ठरले. २०१९ मध्ये झाकीर हुसेन यांना संगीत नाटक अकादमीकडून ‘अकादमी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही पदवी प्रदान केली होती. तबल्याच्या ठेक्याने सर्वांची मने जिंकणाऱ्या झाकीर हुसेन यांनी अभिनयातही हात आजमावला. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये १२ चित्रपटांमध्येही काम केले. झाकीर हुसेन यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि दोन मुली-अनिसा आणि इसाबेला कुरेशी आहेत.
अफलातून तबला वादनासह लांब केस हे झाकीर हुसेन यांचे स्टाईल स्टेटमेंट बनले होते.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ही कधीही विचार करून हेअरस्टाईल केली नाही. पण हळूहळू लोकांना त्यांची स्टाइल आवडू लागली. मात्र, उस्तादांनी चहा कंपनीच्या ब्रँडसोबत करार केला तेव्हा ब्रँडने त्यांना केस कापू शकत नाहीत अशी अट घातली गेली आणि नंतर लांब केस ठेवणे ही त्याची सक्ती बनली. झाकीर हुसेन यांचे आणि अमेरिकेचे अनोखे नाते होते. त्यांची पहिली लाईव्ह कॉन्सर्ट तिथेच झाली आणि तिथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेला बराच काळ त्यांचे अमेरिकेत वास्तव्य होते. त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील अमेरिकेच्या रस्त्यांवरील आहे. ६ आठवड्यांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये ते अमेरिकेच्या रस्त्यावर फिरताना थंडगार वाऱ्याचा आनंद घेत होते. झाकीर हुसेन यांनी शेअर केलेल्या शेवटच्या व्हीडिओमध्ये ते निसर्गाचा आनंद घेत होते. झाकीर हुसेन यांनी तब्बल ६ दशके आपल्या अनोख्या आणि सुरबद्ध तबला वादनाने करोडो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कलेचे शब्दांत व्याख्या करणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. उस्ताद हे संगीत जगतातील एक तारा होते. हा तारा आता निखळला आहे. मात्र, त्यांची अनोखी तबलावादन शैली श्रोत्यांच्या कायम स्मरणात राहील.