देशाच्या राजकारणात अगदी निवडणुकांच्या प्रचारामध्येदेखील संविधान या शब्दाचा वारंवार वापर केला जात आहे. अर्थांत संविधान शब्दाचा वापर सर्वसामान्य जनतेकडून नाही, तर राजकीय घटकांकडून विशेषत: काँग्रेस व मित्र पक्षाकडून वारंवार करण्यात येत आहे. अर्थांत काँग्रेस व त्याच्या मित्र पक्षांना भारतातील सर्वसामान्य जनतेचा पुळका आहे अथवा संविधानाबाबत विशेष प्रेम आहे, अशातला भाग नाही. २०१४ पासून भारतीय राजकारणाच्या पटलावर मोदी पर्वाचा केंद्रीय स्तरावर उदय झाल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ घडण्यास सुरुवात झाली आहे. २०१४ नंतर देशाच्या राजकारणात काँग्रेसची पिछेहाट झाली. जनाधार गमवावा लागला. २०१९च्या लोकसभा निवडणूकीत तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळविता आले नाही. भाजपा व मित्रपक्षांचे सरकार २०१४, २०१९ अगदी एप्रिल २०२४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही सातत्याने तिसऱ्यांदा भाजपा व मित्रपक्षांचे सरकार सत्तेत आले आहे.
गेल्या एक दशकापासून भाजपाकडे देशातील जनतेचा जनाधार असल्याने निवडणुकीत सरळसरळ प्रचार करून भाजपाला पराभूत करणे शक्य नाही, हे काँग्रेस व मित्रपक्षांनी ओळखल्यामुळे त्यांनी गोबेल्स तत्त्वाचा आधार घेत संविधानाविषयी अपप्रचार करत भारतीयांची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला. या प्रचाराला काही प्रमाणात देशातील जनता बळी पडली. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेमतेम पन्नाशीच्या आसपास जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला शंभर जागा गाठणे शक्य झाले. संविधानाबाबत अपप्रचार करून काँग्रेस व मित्रपक्ष जनसामान्यांमध्ये भाजपाची चुकीची प्रतिमा निर्माण करत असल्याने या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी व भारतीयांना वस्तूस्थिती दाखवून देण्यासाठी भाजपा आता स्वत:च मैदानात उतरली आहे. भाजपा संविधानाबाबत किती गंभीर आहे, हे शनिवारी संसदेतील लोकसभा कामकाजादरम्यान पाहावयास मिळाले.
काँग्रेसच्या प्रियंका गांधी व राहूल गांधी या बहीण-भाऊ असलेल्या खासदार जोडगोळीने सभागृहात पुन्हा एकवार संविधान प्रकरणी भाजपावर हल्लाबोल केला. मुळात काँग्रेसच्या कोणत्याही घटकाला संविधान शब्द उच्चारण्याचाही कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. स्वातंत्र्यापासून संविधानाची सर्वाधिक चिरफाड काँग्रेस पक्षानेच केलेली आहे. सत्तेत असताना बहूमताच्या जोरावर सातत्याने काँग्रेसने घटनेत बदल केला आहे. त्यामुळे ज्यांनी संविधानाबाबत तोडफोड केली, देशावर आणीबाणी लादत या देशाच्या लोकशाहीचा गळा घोटला, त्याच काँग्रेसने संविधानाबाबत चिंता व्यक्त करणे म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होण्याचा प्रकार आहे. सर्वसामान्यांची दिशाभूल करून आपल्याकडे जनाधार वळविण्याचा प्रयत्न करण्याची ती एक राजकीय खेळी होती. पण ही खेळी आता वेळीच सर्वांच्या लक्षात येऊ लागली आहे. संसदेत काँग्रेस व मित्र पक्षांकडून सातत्याने संविधानाबाबत टाहो फोडला जात असताना या काँग्रेसनिर्मित संविधानाच्या नावाखाली चक्रव्यूह रचला जात असताना हा चक्रव्यूह फोडण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मैदानात उतरले आहेत.
संसदेत त्यांनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान स्वातंत्र्यापासून आतापर्यत काँग्रेसने केलेली चिरफाड, लोकशाहीचा घोटलेला गळा, संविधानात दुरुस्ती आदी सर्वांचा पंचनामा पंतप्रधान मोदी यांनी केला. आपले संविधान एक सुरक्षा कवच आहे. जे देशातील लोकांना सुरक्षित ठेवते. वाईट गोष्ट ही आहे की सत्ता पक्षातील सहकारी जे मोठमोठ्या गोष्टी करतात त्यांनी गेल्या १० वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे वचन एक सुरक्षा कवच आहे. लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे. जर लोकसभा निवडणुकीत हा निकाल आला नसता, तर यांनी संविधान बदलण्याचे कामदेखील सुरू केले असते असा आरोप खासदार प्रियंका गांधी यांनी लोकसभेतील कामकाजादरम्यान केला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी संविधानावर बोलताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. प्रियंका गांधी व राहूल गांधी यांनी लोकसभेमध्ये संविधानावर सातत्याने चर्चा करत संविधानाविषयी काँग्रेसला प्रेम व जिव्हाळा असल्याचे चित्र निर्माण केले होते. पण हे प्रेम बेगडी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून विविध उदाहरणांसह देशाच्या निदर्शनास आणून दिले.
गेल्या ७५ वर्षांतील महत्त्वाच्या काही घटनांचाही उल्लेख केला. १९७५ मध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती, ‘काँग्रेसच्या डोक्यावरचे हे पाप कधीच धुतले जाणार नाही’. आपण जर इतिहासाकडे वळून पाहिले, तर जेव्हा देश संविधानाचे २५ वर्षे पूर्ण करत होता. तेव्हा आपल्या देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. सर्व संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाला एकप्रकारे जेलखाना बनवण्यात आले होते. सर्वांचे हक्क हिरावून घेतले गेले होते. प्रेसच्या स्वातंत्र्यावर टाळे लावले गेले. मात्र काँग्रेसच्या डोक्यावर लागलेले हे पाप कधीही धुतले जाणार नाही. जगभरात जेव्हा-जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा-तेव्हा काँग्रेसच्या डोक्यावरचे हे पाप दिसेल, असे पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले. काँग्रेसने किती वेळा घटनादुरुस्ती केली याची चिरफाड करत संविधानाप्रती काँग्रेसचा असलेला पुतना मावशीच्या प्रेमाचा चेहरा देशाला दाखवून दिला. कलम ३७० ही देशाच्या एकात्मतेची भिंत बनली होती. मात्र कलम ३७० देखील रद्द करण्यात आले आहे. देशाची एकता हीच आमची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. संविधानाबाबत सातत्याने बोलून काँग्रेस जनसामान्यांची दिशाभूल करत असल्याचे काय परिणाम होतात, याची भाजपाला लोकसभा निवडणूक निकालातच जाणिव झाली होती. काँग्रेसच्या संविधानाच्या बुरख्याआड रचल्या जाणाऱ्या राजकीय षडयंत्राविरोधात आता दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीच मैदानात उतरल्याने भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मित्रपक्षांनाही मैदानात उतरावे लागणार आहे. येत्या काळात राजकीय स्वार्थासाठी संविधान नावाचे ब्रम्हास्त्र काँग्रेसच्या मागील संविधानाविषयक दुष्कृत्यामुळे त्यांच्यावरच उलटणार असल्याचे चित्र तुर्तास निर्माण झाले आहे.