मी फडणवीस यांच्या पाठीशी
नागपूर : राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मी फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, गेली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. आम्ही जे निर्णय घेतले त्यावर जनतेने विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले. जनतेप्रती आमचे उत्तरदायित्व आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात विदर्भाला आम्ही न्याय दिला. आगामी काळात अधिक गतिमानपणे काम करून जनतेला लोकाभिमुख सरकारचा अनुभव देऊ.
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामांन्यांचं सरकार कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ. अडीच वर्षात केलेल्या विकास कामांची ही आजची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य जनता आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू राज्याची वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच स्वप्न साकारले जाईल, अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी दिली.