ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत भारताची स्थिती खराब झाली आहे. भारताने केवळ २२ धावांमध्ये ३ विकेट गमावलेत. विराट कोहली ३, यशस्वी जायसवाल ४ आणि शुभमन गिल केवळ एक धावा करू शकला. केएल राहुल क्रीझवर आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे भारत अद्याप ४२३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ७ फलंदाज शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी जबरदस्त शतकी खेळी केली. स्मिथने १९० बॉलमध्ये १०१ धावा केल्या तर ट्रेविस हेडने १६० बॉलमध्ये १५२ धावा तडकावल्या.
तर अॅलेक्स कॅरेने ७० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला चारशेपार धावसंख्या नेण्यात मदत केली. कर्णधार पॅट कमिन्सला या डावात केवळ २० धावाच करता आल्या. याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया १-१ अशा बरोबरीत आहेत. भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमबॅक करताना दुसऱ्या कसोटीत भारतावर मात केली. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.