लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटींच्या निधीची तरतूद
नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवळी अधिवेशनात आज, सोमवारी पहिल्याच दिवशी 35 हजार 788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्यात. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या मागण्या मांडल्या होत्या.
नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून आज 35,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. याशिवाय, मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोट येथईल शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे.
एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 490.24 कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 195 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत. हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.पुरवणी मागण्यांपैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतंर्गत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी 1204 कोटी तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना 758 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मासिक लाभ 1500 वरुन 2100 करण्याबात अद्याप तरतूद करण्यात आली नाही.