मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा(Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामना रविवारी १५ डिसेंबरला खेळवण्यात आला. हा खिताबी सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रंगला होता. यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना फायनल सामना आणि खिताब दोन्ही आपल्या नावे केले.
सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करताना रजत पाटीदारच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश संघाने सर्व बाद १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने १७.५ षटकांतच ५ विकेट गमावताना १८० धावा करत खिताबावर शिक्कामोर्तब केले.
पाटीदारची कर्णधाराला साजेशी खेळी
सामन्यात पहिल्यांदा खेळी करताना मध्य प्रदेशच्या संघाने ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. संघाची सुरूवात खराब झाली होती. संघाने ६ वर २ विकेट गमावले होते. त्यानंतर ८६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीत कर्णधार पाटीदारने मोर्चा सांभाळला आणि ४० बॉलमध्ये ८१ धावांची नाबाद खेळी केली.
पाटीदारने आपल्या खेळीदरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. तर मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रोयस्टन डायसने प्रत्येकी २ विकेट मिळवले.