कथा – रमेश तांबे
दीपक झोपडपट्टीत राहायचा. तिथल्याच महापालिकेच्या शाळेत जायचा. त्याच्या घरी आई-बाबा, दोन लहान बहिणी होत्या. दीपक जरी झोपडपट्टीत राहात होता, तरी तो अतिशय समंजस होता. हुशार होता. आपण अभ्यास करून घरची गरिबी दूर केली पाहिजे असे त्याला वाटायचे. त्याचे वागणं-बोलणं अगदी छान होतं. साऱ्यांना वाटायचं दीपक म्हणजे चिखलात उगवलेलं कमळच! कारण झोपडपट्टी म्हटली की भांडणं, मारामाऱ्या, दारूच्या नशेत चूर झालेली माणसं, कचाकचा भांडणाऱ्या बायका, शाळेत न जाणारी आणि बिनधास्त शिव्या घालणारी, चोऱ्यामाऱ्या करणारी मुलं! पण या साऱ्या प्रतिकूल वातावरणात राहून देखील दीपक मात्र अगदी वेगळा होता, अभ्यासू होता, सुसंस्कृत, विनम्र स्वभावाचा होता.
दीपक शाळेच्या शिक्षकांचादेखील आवडता विद्यार्थी. वर्गातच नाही तर संपूर्ण शाळेतून सर्वात जास्त गुण मिळवून पास होणारा. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारा, शालेय क्रीडा स्पर्धा गाजवणारा दीपक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या अगदी गळ्यातला ताईतच बनला होता. पण का कुणास ठाऊक नेहमी आनंदी दिसणारा, सर्वांशी हसून राहणारा दीपक सध्या वर्गात कोणाशी बोलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह असा दिसतच नव्हता. ही गोष्ट त्याच्या वर्गशिक्षकांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी दोन मुलं दीपकच्या घरी चौकशी करण्यासाठी पाठवली.
चौकशी करणारी दोन्ही मुलं दोन दिवसांनी सरांना भेटली आणि त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून सरांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढा चांगला मुलगा दीपक असं काही करत असेल असे वाटलं नव्हतं. ती दोन मुलं म्हणाली, “सर काल संध्याकाळी आम्ही दीपकला जुगार खेळताना आणि त्यावरून मारामारी करताना, शिव्या देताना पाहिलं. दीपकचा हा अवतार सगळ्यांना नवा होता. गेल्या आठवड्यात दीपकला पोलिसांनी पकडून नेलं होतं. कुठल्या तरी महिलेची पर्स चोरण्याचा त्याच्यावर आरोप होता. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला सोडून देण्यात आलं होतं.
आठवड्याभराची सुट्टी मारून दीपक शाळेत हजर झाला. त्याचा चेहरा संपूर्ण उतरला होता. चेहऱ्यावरचे हास्य पळून गेले होते. खाली मान घालून दीपक वर्गात बसला. तशी वर्गात कुजबूज सुरू झाली. कालपर्यंत दीपक सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होता. आज मात्र सारे त्याला वेगळ्याच नजरेने पाहत होते. तेवढ्यात पाटील सर वर्गात आले. सर्वांनी त्यांना उभे राहून “एक साथ नमस्ते” केले. पाटील सरांची नजर दीपकवर पडली आणि त्याला बघून सरांच्या काळजात धस्स झालं. आनंदी आणि हसमुख असणारा दीपक आज तोंड वाकडं करून, मान खाली घालून बसला होता.
“दीपक” अशी सरांनी हाक मारताच तो भानावर आला. सरांनी नजरेनेच त्याला आपल्या जवळ बोलावले. सरांसमोर जाताच दीपकचा बांध फुटला. तो मुसमुसून रडू लागला. “मला माफ करा सर. मी चुकलो. मला शिक्षा करा.” त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. सर म्हणाले, “रडू नकोस दीपक, सांग काय झालं. खरं सांग. सगळ्या वर्गाला सांग, तू असं का वागलास? तो जुगार, त्या मारामाऱ्या, ते पोलीस स्टेशन सगळं खरं खरं सांग!” दीपक बोलू लागला, साऱ्या वर्गाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. “खरं आहे सर, मी जुगार खेळलो, मारामारी केली, मी पर्स चोरली म्हणून पोलिसांनी मला खूप मारलं. एक दिवस कोठडीत ठेवलं कारण मीच कमनशिबी आहे. सर खरं मला हे काहीच आवडत नाही. पण मला माझे सावत्र बाबा हे सर्व करायला भाग पडतात. एवढे दिवस मी नकार देत होतो. पण त्या दिवशी त्यांनी मला आणि माझ्या आईला खूप मारलं. घराबाहेर काढलं अन् म्हणाले, “जोपर्यंत दीपक घरात पैसे कमवून आणत नाही तोपर्यंत दोघांनी घरात यायचं नाही. एक रात्र आम्ही मायलेकांनी घराबाहेरच काढली. मग माझ्यापुढे पर्याय नव्हता आणि मी ते केलं जे माझ्या वडिलांना हवं होतं. बोलता-बोलता दीपक रडू लागला.
पाटील सरांनी दीपकला जवळ घेतलं आणि म्हणाले, “घाबरू नकोस दीपक, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण वाईट मार्ग पत्करू नकोस. मग शाळेच्या विश्वस्तांशी बोलून पाटील सरांनी दीपकच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दीपकचे वडील ताळ्यावर आले आणि दीपकला कोणतेही वाईट काम करण्यास सांगणार नाही, असे हमीपत्र त्यांनी पोलिसांना लिहून दिले. शिवाय दीपकच्या शिक्षणाची जबाबदारीही शाळेने उचलण्याचे मान्य केले. दीपक नावाच्या हिऱ्याला वाया जाण्यापासून वाचवले याचे समाधान पाटील सरांच्या चेहऱ्यावर झळकत होते. खरे तर पाटील सरांमुळेच दीपकच्या जीवनात एक नवी पहाट उगवली होती, उज्ज्वल भविष्याकडे जाणारी…!