मुंबई: महायुतीच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यात नवे मंत्री नागपुरातील शपथविधी सोगळ्यात शपथ घेतील. यातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी सोहळ्यादरम्यान ३० ते ३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
राज्यात होत असलेला मंत्रिमंडळ विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीपरिषदेत मुख्यमंत्र्यांसह अधिकाधिक ४३ सदस्य असू शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नुकतेच राज्य भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वेगवेगळी भेट घेतली होती.
सूत्रांच्या म्हणण्यांनुसार भाजपला या मंत्रिमंडळात २०-२१ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यानंतर शिवसेनेला ११-१२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९-१० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत महायुतीला २३० जागा
२० नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ जागांपैकी २३० जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले होते. भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने ५७ तर पवारांच्या एनसीपी गटाने ४१ जागांवर विजय मिळवला होता.