श्रीनिवास बेलसरे
पूर्वी नामवंत लेखकांच्या कथा चित्रपटांसाठी घेतल्या जात. अगदी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद किंवा परदेशी लेखकात शेक्सपियर, अॅगाथा ख्रिस्ती, ए. जे. क्रोनिन, मरिओ पुझो यांच्यासारख्यांच्या कथांवरही चित्रपट निघाले आहेत. विल्यम शेक्सपियरच्या अनेक नाटकांवर आणि अनेकदा तर एकाच नाटकावर अनेक सिनेमा निघाले आहेत. कारण त्या काळी सर्वच गोष्टींबाबत एक दर्जा टिकवण्याची पद्धत होती. असाच एक चित्रपट सुरुवातीला साफ पडला होता आणि नंतर मात्र चित्रपटनिर्मिती शिकवणाऱ्या महाविद्यालयात आजही चर्चिला जात असतो. तो म्हणजे फणीश्वरनाथ ‘रेणू’ यांच्या ‘मारे गये गुलफाम’ या कथेवर बेतलेला १९६६ चा ‘तिसरी कसम’!
प्रमुख भूमिकेत होते राज कपूर (हिरामण), वहिदा रहमान (हिराबाई), दुलारी (हिरामणकी भाभी), इफ्तेखार (जमीनदार विक्रमसिंह), ए. के. हंगल, आसीत सेन, सी. एस. दुबे, कृष्ण धवन आणि केस्टो मुखर्जी (शिवरतन). निर्माते होते चक्क गीतकार शैलेंद्र आणि दिग्दर्शक बसू भट्टाचार्य. सुरुवातीला मेहमूद आणि मीना कुमारीला घेऊन सिनेमा काढायचे ठरले होते पण तसे झाले नाही. ‘तिसरी कसम’च्या जबरदस्त अपयशानंतर निर्माते शैलेंद्र यांचे पुढच्याच वर्षी निधन झाले.
संवादलेखन स्वत: शैलेंद्र यांनी केले. काही गाणी त्यांनी आणि काही हसरत जयपुरी यांनी लिहिली. शंकर जयकिशन यांच्या संगीतामुळे बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. त्यातही ‘पान खाये सैंया हमारो’, ‘चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजरेवाली मुनिया’, लोकांना फारच आवडली. ‘सजन रे झुठ मत बोलो, खुदा के पास जाना हैं,’ या गाण्यांचा तर त्या वर्षीच्या बिनाका गीतमालेत ७ वा क्रमांक आला.
चित्रपटासाठी शेलेंद्र आणि बासू भट्टाचार्य यांना १९६७ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ मिळाले. ‘बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन’तर्फे सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून बासुजींना, सर्वोत्तम अभिनेता म्हणून राज कपूरला आणि सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून वहिदाला पारितोषिक मिळाले. शैलेंद्रचे नामांकन फिल्मफेयरच्या सर्वोत्तम गीतकार पुरस्कारासाठी (सजन रे झुठ मत बोलो) झाले होते, तर बासुजींचे नामांकन मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाले होते. एवढेच नाही, तर १० वीच्या (सीबीएससी) अभ्यासक्रमाला ‘तिसरी कसम के शिल्पकार : शैलेंद्र’ नावाचा धडाही लावण्यात आला. कथा अशी होती – राज कपूर (हिरामण) एक गाडीवान असतो. त्याच्या गाडीत नाटक मंडळीतील हिराबाई (वहिदा) एका गावाच्या जत्रेत जाण्यासाठी बसते. प्रवासात मधे-मधे दोघांत जुजबी बोलणे होते. भोळाभाबडा हिरामण वहिदाला त्याच्या जीवनात घडलेल्या आठवणीही सांगतो. एकदा तो नेपाळच्या सीमेवर अजाणतेपणी तस्करीच्या आरोपात पकडला गेलेला असतो. मग त्याने घाबरून पुन्हा ‘असले सामान’ आपल्या गाडीतून न वाहण्याची शपथ घेतलेली असते. अशीच दुसऱ्या एका कटू अनुभवात गाडीतून बांबूचे सामान न वाहण्याची शपथ घेतली असते.
रस्ताभर घडत गेलेल्या प्रसंगामुळे हिराबाईला त्याचे साधेभोळे व्यक्तिमत्त्व भावून ती त्याच्या प्रेमात पडते. भाड्याचे पैसे देताना ती त्याला आपल्या नौटंकीच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही देते. तिथे काही प्रेक्षक तिच्याबद्दल अपशब्द काढतात, तेव्हा त्याला राग येऊन तो त्यांच्याशी भांडतो. तिला हे काम सोडण्याची सूचना करतो. आधी वाहिदाला राग येतो पण त्याचा निरागसपणा बघून तिचे त्याच्याबद्दलचे प्रेम अजूनच वाढते; परंतु त्यांच्या संबंधाबाबत समाजाच्या टीकेमुळे आणि जमीनदाराच्या वहिदाबद्दलच्या वाईट नजरेमुळे अनेक समज-गैरसमज होतात. शेवटी त्या दोन्ही भाबड्या जीवातील उत्कट, निरागस प्रेमकथेचा अंत होतो. हिराबाईला आपल्या ‘व्यवसायात’ परतावे लागते आणि हिरामण निराश होऊन गावी परत जायला निघतो तेव्हा तो स्वत:शीच तिसरी शपथ घेतो की, ‘पुन्हा कधी नौटंकीमधील स्त्रीला गाडीत बसवायचे नाही. अशी ही भावूक शोकांतिका! आपापल्या भूमिकात वहिदा आणि राज कपूरने अक्षरश: कहर केला होता. एकेक प्रसंग इतका खरा वाटतो की, त्यांच्या अभिनयाला दाद द्यावीच लागते. हिरामण हिराबाईला रस्त्यात एक गोष्ट सांगतो त्यावेळी तो एक गाणे म्हणतो. मुकेशचा जन्मच राज कपूरला आवाज देण्यासाठी झाला होता या गोष्टीचा प्रत्यय देणाऱ्या शैलेंद्रच्या त्या गाण्याचे शब्द होते –
‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई,
तुने काहे को दुनिया बनायीं?’
अनेकांच्या मनात हजारदा पडलेल्या प्रश्नांनाच शैलेंद्रने जणू वाट मोकळी करून दिली होती! प्रत्येक गोष्टीचा शेवटी विनाशच होणार आहे, तर मुळात देवाने हे जग निर्माणच कशाला केले? देवा, काळाच्या ओघात मातीत मिसळून जाणाऱ्या आम्हा माणसांना तू घडवतोसच कशाला? आमच्यासाठी ही सुंदर, वत्सल पृथ्वी अंतराळात अधांतरी कशाला टांगलीस? जीवनात तारुण्याचा बेधुंद काळ का ठेवलास आणि त्यात उमलणारे प्रेम तरी कशाला निर्माण करतोस रे? वर आमच्या निरागस मनाची घालमेल भावनाशून्यपणे बघत बसतोस, असा कसा रे तू देव?
‘काहे बनाये तूने माटी के पुतले,
धरती ये प्यारीप्यारी मुखड़े ये उजले,
काहे बनाया तूने दुनिया का खेला,
जिसमें लगाया जवानीका मेला…
गुप-चुप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाई
काहे को दुनिया…!’
माणसाचे मन निर्माण केल्यावर तुलाही त्याच्या मनात उठणारे भावनांचे वादळ अस्वस्थ करून गेलेच असेल ना? तुला तूच निर्माण केलेली एखादी ‘मूर्ती’ भावली नसेल का? तिच्या विरहात तुझेही डोळे पाणावले असतीलच ना? मग माणसाच्या मनात प्रीतीची ती हळवी, नाजूक भावना निर्माणच का केलीस?
‘तू भी तो तडपा होगा मनको बनाकर,
तूफां ये प्यारका मनमें छुपाकर,
कोई छवि तो होगी आँखों में तेरी,
आंसूं भी छलके होंगे पलकोंसे तेरी.
बोल क्या सूझी तुझको काहेको
प्रीत जगाई,
काहेको दुनिया…!’
माणूस प्रेमात सगळे काही शिकतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिकतो, दुसऱ्याच्या दु:खात रडायला शिकतो. त्याग शिकतो, संयम शिकतो तेव्हाच तर त्याला जीवनभराची साथ देणारा जोडीदार भेटतो ना? मग आयुष्यभराची सुखस्वप्ने रंगवावीशी वाटू लागतात. पण तूच त्या सुखाचा शेवट घडवून त्यांची ताटातूट घडवतोस ना? मग हे जग बनवलेसच कशाला? असा शैलेंद्रजींचा देवाला खडा सवाल आहे.
‘प्रीत बनाके तूने जीना सिखाया,
हँसना सिखाया, रोना सिखाया,
जीवन के पथपर मीत मिलाये,
मीत मिलाके तूने सपने जगाए,
सपने जगा के तूने काहे को
दे दी जुदाई?
काहे को दुनिया…!’
खुद्द जग नियंत्यालाच असे प्रश्न विचारायचे आपले धाडस होत नाही. मग आपल्या वतीने, आपली वकिली करणारे, असे देवाच्या कोर्टात त्यालाच धारेवर धरणारे कवी मला फार आवडतात, तुम्हाला?