भालचंद्र ठोंबरे
एकदा हूहू नामक एक गंधर्व एका सरोवरात आपल्या पत्नी समवेत विहार करीत होता. त्याच वेळी त्या सरोवरात देवल नावाचे ऋषी स्नान व सूर्याला अर्घ्य देण्यात मग्न होते. गंधर्वाला ऋषींची चेष्टा करण्याची इच्छा झाली. त्याने पाण्याखालून पोहोत जाऊन देवल ऋषींचा पाय पकडला. या कृतीमुळे ऋषींच्या ध्यानसाधनेत व्यत्यय आला, त्यामुळे देवल ऋषींनी क्रोधीत होऊन गंधर्वाला पुढच्या जन्मी मगरीच्या जन्मात जाण्याचा शाप दिला. गंधर्वाला आपली चूक कळली. गंधर्वाने ऋषींजवळ क्षमायाचना केली असता, ऋषींनी दिलेला शाप मागे घेता येत नाही असे सांगून श्रीविष्णू स्वतः येऊन तुझा उद्धार करतील असा उ:शाप गंधर्वाला दिला.
पुराणात एका नावाच्या अनेक राजांचा उल्लेख सापडतो. जसे की, मालवाचा इंद्रद्युम्न, अवंतीचा इंद्रद्युम्न, पांड्यचा इंद्रद्युम्न. ही गोष्ट आहे पांड्या देशातील इंद्रद्युम्न या राजाची. त्याकाळी पांड्य देशात (सध्याच्या तामिळनाडू भागात) इंद्रद्युम्न नावाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत धार्मिक व विष्णू भक्त होता. प्रजाही धार्मिक विचारांची होती. एके दिवशी इंद्रद्युम्न राजा पूजेत मग्न असताना ऋषी अगस्ती त्याला भेटावयास आले. पूजेत असल्याने राजा त्यांचे आदरातिथ्य करू शकला नाही. अगस्ती ऋषींना राग आल्याने त्यांनी राजा इंद्रद्युम्नला पुढच्या जन्मी हत्ती होण्याचा शाप दिला.
शापाच्या प्रभावाने गंधर्व मगर झाला व इंद्रद्युम्न हत्ती झाला. इंद्रद्युम्न हत्ती होऊन चित्रकूट पर्वतावरील ऋतुमत नावाच्या उद्यानात राहत असे. गजेंद्र हा त्या उद्यानातील हत्तींच्या कळपांचा राजा असून तो दररोज एका सरोवरात आपल्या कळपासह विहार करीत असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो विहार करीत असताना एका विशालकाय मगरीने त्याचा पाय तोंडात घट्ट धरला. गजेंद्राने पाय सोडवून घेण्याचा भरपूर प्रयास केला. त्या प्रयत्नात तो जीवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याचे सहकारीही त्याच्या मदतीला धावले. मात्र ते त्याला सोडवू शकले नाही. गजेंद्र मगराच्या घट्ट मिठीतून आपली सुटका करून घेऊ शकला नाही. अखेर सर्व प्रयत्न करून निराश झाल्यावर त्याने आपले दैवत असलेल्या श्रीविष्णूंचा धावा केला. आपल्या भक्ताच्या हाकेला श्रीविष्णू धावून आले. त्यांना पाहून गजेंद्र उत्साहित झाला व त्याने आपल्या सोंडेत सरोवरातील कमळाचे फुल तोडून त्यांना अर्पण करण्याच्या हेतूने सोंड वर उचलून भगवान श्रीविष्णूंना नमन केले. श्रीविष्णूंनी सुदर्शन चक्राच्या साहाय्याने मगराचा वध करून गजेंद्राची सुटका केली. अशा रीतीने गजेंद्ररूपी इंद्रद्युम्नचा तसेच मगररूपी गंधर्वाचा उद्धार केला.
या संसाररूपी सरोवरात गजेंद्ररूपी मनुष्याला त्याच्या भावना, इच्छा, वासना, गंधर्वरूपी मगरीने घट्ट धरले असून यातून केवळ विष्णू नामच त्या व्यक्तीला तारू शकते, असे रूपक या कथेतून सूचित केले आहे. गजेंद्रने श्रीविष्णूची केलेली स्तुती “ गजेंद्र मोक्षस्त्रोत्र’’ या नावाने प्रसिद्ध आहे. ही कथा श्रीमद्भागवत गीतेच्या आठव्या स्कंधानुसार शुकदेवांनी महाराजा परीक्षिताला त्याच्या विनंतीवरून कथन केली आहे. या गजेंद्र मोक्षरूपी स्तोत्राचे वा कथेचे पठण केले असता सर्व संकटापासून मुक्ती मिळते अशी भावना सर्व धर्मवत्सल लोकांमध्ये आहे.