Friday, February 14, 2025
Homeसाप्ताहिककोलाजवैचारिक इंद्रधनुष्य

वैचारिक इंद्रधनुष्य

डॉ. अनिल कुलकर्णी

रोज सूर्याच्या किरणांबरोबर असंख्य विचार मनात येतात. काही विचार मनात घर करतात. काही स्वच्छंदी पक्षाप्रमाणे उडून जातात. माणसाला काही न काही कुणाकडे तरी बघून सुचतं. निरीक्षण आणि विचार हातात हात धरून प्रवास करतात. जेवढं निरीक्षण सखोल, तेवढी विचारांची उंची उंच असते. विचार व आठवणी बंदिस्त केल्याशिवाय भरभरून परतावा देत नाहीत. प्रत्येकाच्या विचारांची धाटणी वेगळी असते. माणसे विचारानेच असामान्य होतात. चांगले विचार येण्यासाठी केवळ अानुवंशिकतेचा वारसा पुरत नाही. संघर्षात्मक परिस्थिती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती या बाबीही आवश्यक आहेत. समृद्ध वारसा नसलेल्यांनीही इतिहास घडविला आहे. भूमिकेत शिरून लिहिण्यापेक्षा भूमिका जगून लिहिलं जातं ते कसदार साहित्य असतं. सहज सुचतं ते उत्स्फूर्त असतं.

निरीक्षणाच्या टीप कागदाशिवाय वास्तव टिपता येतच नाही. सभोवताली अनेक घटना आयुष्याला कौल देणाऱ्या असतात पण त्याची नोंदच आपण घेत नाही. अनेक व्यक्ती आपल्या आयुष्याला कौल देतात, आपल्याला एका विशिष्ट वळणावर आणणे याला काही घटना, व्यक्ती कारणीभूत असतात. आयुष्याचं वास्तव टिपण्यासाठी विचार मदत करतात.
आशयामध्ये आपलेपणा, अस्सलपणा असला की, परकेही आपले होतात. प्रत्येक माणूस सारखा असला तरी तो एक कथाबीज पुरवतो, त्यातूनच वैविध्य असलेलं व्यक्तिचित्रं साकार होतं. निरीक्षणाचा टिप कागद असल्याशिवाय व्यक्तिचित्रण चितारताच येत नाही.कथासंग्रहात सर्व कथा एका शीर्षकाभोवती गुंफलेल्या असतात, जणू अंबरातील बगळ्यांची माळ फुले. कथांची नाळ वास्तवाशी जोडलेली असल्यामुळे हृदयाला भिडते. शास्वत सौंदर्याला अलंकाराची गरज नसते. सामान्यामधील असामान्यत्वाचा शोध घेण्यासाठी प्रचंड निरीक्षणशक्ती आवश्यक असते व तिला योग्य शब्दांत मांडणे आवश्यक असते. एका नात्याची दुसऱ्या नात्यांशी तार जुळलेली असते तिला शब्दांच्या चिमटीत पकडता यायला हवं.

माणसेच अमर होतात असे नव्हे तर कथेतील काल्पनिक पात्रही अमर करण्याचे कौशल्य लेखकाकडे असतं. ठिपक्यांची रांगोळी लेखक रेखाटतो, त्यात रंग भरणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एकाच वेळी अनेक नात्यांशी आपला संबंध येतो पण प्रत्येक नात्याची वीण घट्ट असते असे नाही. कुटुंब पद्धतीमध्ये नाती सर्व खुंटीला टांगली आहेत. कथा म्हणजे कल्पनेतली सहल नाही. वास्तवाच्या खाच- खळग्यातून झालेला तो प्रवास असतो. साहित्यातून नातेसंबंध झिरपत नाहीत तर, आपल्या मनावर वेगळा ठसा उमटवितात. साध्या साध्या घटनांमधून तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न कथालेखक करतो. आपल्याभोवती ही असंख्य व्यक्ती, घटना असतात पण त्यावर चिंतन करून आपण त्याला शब्दबद्ध करत नाही.
कथेमध्येही वास्तवापासून दूर न जाता, कोणत्याही अलंकाराचा वापर न करता कथा लेखकाच्या कल्पनाशक्तीने वास्तवाचा आभास निर्माण करू शकते.

कथासंग्रह म्हणजे घटनांचा गोळा केलेला कचरा नसतो तर ती सुंदर फुलांची माळ असते. आपले जीवन म्हणजे एक कथासंग्रह असतं, अनेक कथांनी भरलेलं असतं.जे आपल्याला शब्दबद्ध करता येत नाही ते लेखक कौशल्याने आपल्या समोर वास्तव म्हणून ठेवतो. कथेमधून वास्तवच झिरपत नाही तर लेखकही झिरपतो. वेदना, दुःख, वास्तव वातानुकूलित खोलीत अनुभवण्याच्या गोष्टी नसून वास्तवात जगल्या तरच साहित्यात उतरतात. साहित्य निर्मिती असेल तर कौल मिळतोच. वास्तवात तावून सुलाखून निघालेल्या घटनाच मनांत घर करतात. विचारातून मानवी वर्तनाचा संदेश पाझरतो. कथा म्हणजे आपल्या कोऱ्या मनावर साकारलेलं कोलाज असतं. कथेमधून लेखकाचं भावविश्वच पाझरत नाही तर आपल्या सभोवतालचं वास्तव प्रतिबिंबित होतं. आशय समृद्धी असेल तर वाचकांचा कौल साहित्याला असतोच. कोणाला कविता सुचते, कोणाला कादंबरी सुचते. सुचणे हा ज्याचा त्याचा प्रांत आहे. माणसांची राख होते पण विचारांची कुठे राख होते? शब्दांचा जेव्हा इंद्रधनुष्य होतो तेव्हा कविता अवतरते. कविता सहज सुचत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -