लता गुठे
गाडगे बाबा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते एक खराटा जवळ बाळगणारे, अंगावर फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा तो वेष असलेले ‘गाडगे बाबा’. ते अशिक्षित असूनही खरं जीवनाचं तत्त्वज्ञान जगलेले. आत्मपरीक्षण करून समाजाची उन्नती कशी होईल याचा विचार करून समाज परिवर्तनाच्या हेतूने लोकांना उद्देश देणारे. साध्या सोप्या शब्दांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे गाडगे बाबा, खऱ्या अर्थाने संत होते असं मी म्हणेन, कारण संतांची व्याख्या त्यांच्या जगण्याला तंतोतंत जुळणारी आहे, ती म्हणजे “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत आणि आपल्या आचरणातून स्वच्छतेचा संदेश इतरांना देत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर आधी विचारपरिवर्तन करणे गरजेचे आहे हे गाडगे बाबांनी जाणले होते.
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचे वडील झिंगराजी हे परिट होते. आई सखूबाईनी त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनामुळे मृत्यू पावले. वडील वारल्यामुळे ते त्यांच्या आईच्या माहेरी. मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच शेतजमीन होती. घरी गुरू असल्यामुळे छोटासा डेबू गुरं चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. लहानपणापासूनच त्यांना शेतीचा व गुरांचा लळा लागला. शेतीची, गुराची निगराणी ते मनापासून करत असत. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. १८९२ साली त्यांचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा डेबूचे विचार खूप वेगळे होते हे काही उदाहरणावरून लक्षात येते. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले-नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, डेबूजी स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी स्वतःच्या वर्तणुकीतून गावकऱ्यांना शिकविला. हे सर्व करत असतानाच त्यांच्या मनामध्ये वैराग्याची भावना येऊन घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले तो दिवस होता १ फेब्रुवारी १९०५. त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपणहून मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे… “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” असे मुखाने भजन करत त्यांचा दिनक्रम सुरू होता. त्यांचा वेश पाहून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. “देव दगडात नसून तो माणसांत आहे” हे त्यांनी जाणले होते. गाडगे बाबा हे संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार सर्वसामान्यांना अज्ञानी जनतेला समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा म्हणजेच वऱ्हाडी बोली भाषेचा उपयोग करत असत. गाडगे बाबा संत तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा वापरही वेळोवेळी करत. खेड्यापाड्यांतील अशिक्षित माणसापासून ते शहरी भागातील कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
गाडगे बाबांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. हे सर्व करत असताना ते एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे जगले. कसल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहिले आणि गीतेचे तत्त्वज्ञान त्यांनी फक्त आत्मसातच केले नाही तर ते आचरणात आणले.
महाराष्ट्रात संत शिरोमणी नामदेवांनी सुरू केलेली भागवत संप्रदायाची परंपरा पुढे गाडगे बाबांनी आपल्या कर्मयोगाने पुढे चालू ठेवली. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी गाडगे बाबांबद्दल काढलेले गौरवोद्गार म्हणजे, “गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ होय.’’ गाडगे बाबांनी प्रचंड विचाराचे धन समाजाला दिले, त्यापैकी त्यांचे काही महत्त्वाचे विचार हे समाजाने आचरणात आणले तर स्वतःबरोबर समाजाचाही उद्धार होईल. ते मौलिक विचार म्हणजे संत गाडगे बाबांचा दशसूत्री संदेश आहे.
गाडगे बाबा प्रबोधन काव्य…भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी उघड्या-नागड्यांना वस्त्र द्या. तसेच गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करा. बेघरांना आसरा आणि अंध, पंगू रोगी यांना औषधोपचारासाठी मदत करा. बेकारांना रोजगार, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या. गरीब तरुण-तरुणींचे लग्न करण्यासाठी मदत करा. दुःखी व निराश असलेल्यांना हिंमत दिल्यास आणि गोरगरिबांना शिक्षण उपलब्ध करून दिले तर समाजाची उन्नती होईल असे विचार गाडगे बाबांनी दिले आणि त्याचे आचरण अनेक विद्यापीठातून केले गेले. खऱ्या भक्तीचा देवपूजेचा इतका चांगला अर्थ दुसऱ्या कोणीही लावला नाही. अशा या महान विचारांच्या संताचा शेवट अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी झाला. महान कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या समाजसुधारकांची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. २० डिसेंबर रोजी गाडगे बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे या दिवशी त्यांच्या विचारांचे स्मरण करून गाडगे बाबांना नमन करूया…!