स्वाती पेशवे
दिवाळीचे दिवे शांत झाले असले तरी पुढचा बराच काळ उजळलेला आसमंत अनुभवास मिळणार आहे. हवेतील वाढता गारवा, लग्नसराईची सुरुवात असल्याने घरांपासून बाजारापर्यंत बघायला मिळणारा उल्हास, पर्यटनास अनुकूल काळाची मजा लुटत बाहेर पडणाऱ्यांचे जत्थे, शाळांमध्ये रंगणारी संमेलने, वैचारिक आणि कलात्मक वृत्तीची मशागत करणारे महोत्सव हे सर्वच विषय आगामी काळ आल्हाददायक करणारे आहेत. सणासुदीने पुरेपूर भरलेला, उत्सवी काळ सरून नियमित दिनचर्या सुरू झाली असली तरी हा उत्साहात तीळमात्र खंड पडू न देणारा काळ आहे. हो, आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. हवाहवासा वाटणारा गारवा जाणवू लागला आहे. पावसाची जोरदार बॅटिंग संपल्यानंतर यंदा थंडीची इनिंगही चांगली रंगण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्याचबरोबर लग्नसराई सुरू झाल्यामुळे
लगबग काही संपणारी नाही. तेव्हा ताजेपणा टिकवून ठेवणाऱ्या या काळाचे सहर्ष स्वागत करायलाच हवे. प्रत्येक ऋतूतील निसर्गसौंदर्य न्याहाळणे, त्यातील वैशिष्ट्ये अनुभवणे आणि त्यानुसार जगण्याच्या शैलीत फरक करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. या अर्थाने बघता आताचा काळही संपन्नतेच्या खुणा दिमाखात मिरवणारा आहे. सृष्टीवर पसरलेली सोनेरी झाक ऐश्वर्यसंपन्न दिसत आहे. शेताशिवारातील पिकं कापून घरात आणली आहेत. गारवा वाढत असल्यामुळे उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवताच अंगभर शिरशिरी येते आणि थंडीची ही लहर नसानसांपर्यंत पोहोचते. बाहेर डोकावून पाहिले असता धुक्याचा दाट थर अगदी खिडकीलगत पोहोचलेला दिसतो. अगदी फर्लांगभर लांबही नजर जाऊ नये, इतके दाट हे धुके. सध्या वातावरणातील नानाविध प्रदूषणांमुळे अशा घातक घटकांचे मलीन थर पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. मात्र थंडीच्या सुरुवातीला दिसणारे दाट धुके मनाला सुखावून जाते. पानापानांवर गारठलेले दवबिंदू अवतरलेल्या थंडीची साक्ष देतात. या दाट दुलईला भेदून काही चुकार किरणे जमिनीपर्यंत पोहोचतात पण ती कमालीची क्षीण असतात. प्रखरता, उष्णता हे शब्दही त्यांच्या आसपास फिरू शकत नाहीत. अगदी डोक्यावर आलेल्या सूर्याचीही प्रखरता जाणवू नये असे हे दिवस. वातावरणात असा बदल जाणवू लागला की, हवाहव्याशा काळाच्या आगमनाने मन सुखावते.
पूर्वी दिवाळीच्या सुमारासच कडाक्याची थंडी असायची. पण आता ती थोड्या विलंबाने अवतरते इतकेच. खेरीज तिचे बस्तान बसेपर्यंत दुपारी बऱ्यापैकी उष्माही जाणवतो. मात्र संध्याकाळ पुन्हा एकदा आल्हाददायक होते आणि हिवाळ्याच्या या रम्य काळाचा आनंद घेत, गरमागरम जेवणावर ताव मारत जीव हरवून जातो. वातावरणातील हा बदल आरोग्याला उपकारक असतो. हा गारवा कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. या वातावरणात पचनसंस्था साथ देत असल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाजारामध्ये मिळणाऱ्या ताज्या-रसरशीत भाज्या, रसदार फळे आहारातील रूची वाढवतात. पौष्टिक पदार्थ पोटात गेल्याने कांतीवर तेज दिसू लागते आणि आरोग्याचे धन गवसल्याने वृत्ती आनंदी होतात. म्हणूनच हिवाळा हा अनेकांचा आवडता काळ असतो. थंडीमधला माहोलच उत्सवी असतो. दिवाळी साजरी झाली असली तरी फटाक्यांचा वास वातावरणात दरवळत असतो. नव्या कपड्यांची सळसळ कानात घुमत असते. त्यात खास थंडीसाठी म्हणून झालेली स्टाईलिश, ऊबदार कपड्यांची खरेदी आनंदात भर घालत असते. रंगीबेरंगी मफलर, आकर्षक आणि डॅशग लूक देणारी जॅकेट्स, शानदार शॉल्स, स्वेटर्स, स्टोल्स आदींच्या वापरामुळे आपला लूकच बदलून जातो. थंडीपासून बचाव करणारी ही ऊबदार प्रावरणे व्यक्तिमत्त्वालाही अनोखी झळाळी देतात. हा बदल अगदी हवाहवासा वाटतो. त्यातच लग्नसराईची लगबग मिसळते आणि बहार उडते. हिवाळ्यातील लग्नकार्ये ही तर अनोखी पर्वणीच ठरते. उन्हाळ्याच्या किचकिचाटात साजऱ्या होणाऱ्या लग्नसमारंभांपेक्षा हिवाळ्यात साजरे होणारे लग्नसमारंभ विशेष खुमासदार ठरतात. आल्हाददायक वातावरणात जमणारी मंडळी समारंभाचा निवांतपणे आनंद लुटू शकतात. म्हणूनच हे दिवस विशेष आनंद देऊन जातात.
आपल्या आरोग्यशास्त्राने हिवाळ्यासाठी खास आहार सांगितला आहे. त्याचे पालन केल्यास वाढत्या थंडीचा त्रास होण्याची तीळमात्र शक्यता उरत नाही. गरमागरम सूप, पानात पडणारी गरम पोळी अथवा भाकरी, या दिवसांत आवर्जून केली जाणारी बाजरीची भाकरी, तिळाचा कूट वापरून तयार होणारे रुचकर आणि खमंग पदार्थ, ताटाची डावी बाजू सजवणारी सॅलेड्स, चटकदार उसळी, अन्य तळलेले पदार्थ या सर्वांमुळे थंडीतील भोजनाला एक वेगळीच चव मिळते. एरवी फारसे केले न जाणारे काही पदार्थ खास थंडीतच केले जातात. त्यामुळे जिभेची रुची वाढली नाही तरच नवल. साधी कढी ती काय, पण थंडीत खिचडीसवे गरमागरम कढीची चव अशी काही अफलातून लागते की पोट भरले तरी मन भरत नाही. गरम असो वा तिखट, सगळेच पदार्थ या दिवसांत विशेष रुचकर लागतात. थंडी रंगीन आहे. तो रंगांचा महोत्सव आहे. उन्हाळ्यात गडद रंग फारसे खुलून दिसत नाहीत. पावसाळ्यात सगळेच रंग मातकत भासतात, पण थंडीत प्रत्येक रंगाचा सन्मान होतो. कुठलाही भडक कपडा अंगावर छान खुलतो. तो मिरवताना संकोच वाटत नाही. हा रंगांचा महोत्सव लग्नाच्या मंडपात सजतो, फिरायला बाहेर पडणाऱ्या भटक्यांच्या अंगावर शोभतो, गॅदरिंगच्या निमित्ताने स्टेजवर मिरवणाऱ्या लहानग्यांच्या शरीरावर झळकतो आणि या दिवसांत पार पडणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीतही झळकतो. रंगांची ही नक्षी, हे सामर्थ्य चित्तवृत्तीवर सकारात्मक परिणाम केल्याशिवाय राहात नाही.
थंडी आणि व्यायाम हेही नित्याचे समीकरण आहे. एकप्रकारे हा शारीरिक श्रमासाठी, व्यायामासाठी प्रोत्साहित करणारा काळ आहे, असेही आपण म्हणू शकतो. आता कडक उन्हाची तलखी नाही की, पावसाची रिपरिप नाही. घामाची नकोशी चिकचिक नाही की, विचित्र प्रकारचा दाटलेला कोंदटपणा नाही. अशा मोकळ्या-ढाकळ्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंदच काही वेगळा. विशेष म्हणजे दिवस लहान आणि रात्र मोठी असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ऊबदार दुलईत शांत झोप मिळते आणि सकाळी शरीर प्रसन्न मनाने व्यायामाला सिद्ध होते. मनाची तयारी नसताना शरीराची साथ मिळवणे हे खूप अवघड काम आहे. पण थंडीमध्ये मनाची अवस्था चांगली राहात असल्यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते हा मुख्य फायदा आहे. म्हणूनच थंडी हा अनेकांचा मनपसंत ऋतू ठरतो. एकूणच दिवाळीनंतरचे हे दिवस तणावरहित अवस्थेची अनुभूती देतात. कुठल्याही कार्यक्रमामध्ये मध्यंतर असतो ना, तसा असतो हा काळ. हदीत एक छान शब्द आहे, ठहराव… थबकणे. पुढच्या वेगवान प्रवासासाठी हे थबकणे गरजेचे असते. सतत वेगावर स्वार होऊन केलेल्या प्रवासात काही काळासाठी मंदावलेला वेग एक प्रकारचा निवांतपणा देऊन जातो. या निवांतपणात खूप काही साधता येते. या दिवसांत रंगणाऱ्या, बौद्धिक भूक भागवणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी झोडता येते. वैचारिक कार्यक्रमांना उपस्थित राहून मेंदूची क्षमता वाढवता येते. मुलाबाळांच्या गॅदरिंगचा आनंद अनुभवताना हळूच गतकाळाच्या कुशीत शिरता येते. कुटुंबीय अथवा मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीचा आनंद उपभोगता येतो. हा बदल मनस्वी आनंद देणारा आहे. रुटीनमधून बाहेर काढणारा आहे. स्वत:साठी जगण्याची प्रेरणा देणारा आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे या ऋतूमध्ये निसर्गात होणारा बदल अनुभवणे हा देखील एक अपूर्व आनंद ठरतो. हे दिवस पानगळीचे. थंडीमध्ये बहुसंख्य वृक्षांची पानगळ सुरू होते. रस्त्यावरून चालताना पानांचा तळाशी विसावलेला तो ढीग चुरचूर वाजतो. काही छोटी छोटी पिवळी पाने हलकेच आपल्यावर वृष्टी करतात. रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, रानात सगळीकडे पानांचा हा निस्तेज पसारा बघायला मिळतो. हलकीशी झुळूक आली तरी एकीकडचा ढीग दुसरीकडे विसावतो. हे दृश्यही सुखावून जाते. दुसरीकडे, या दिवसांत कुंद, कागडा पानोपानी फुलतात. पाने कमी आणि फुले जास्त अशी त्यांची अवस्था होऊन जाते. अबोलीची मंद छटा लुभावून टाकते. माळावर तिळाच्या केशरी फुलांची रांगोळी सजते. तृणपात्यांवर वेगवेगळे तुरे डोलू लागतात. ते पाहताना डोळे सुखावतात. सृष्टीचे हे पालटलेले रूप एकंदरच वेगळी प्रसन्नता देणारे आहे. नवेपणा, ताजेपणा देणारे आहे. हे दिवस नव्या वर्षाकडे घेऊन जाणारे… एका वर्षांची अखेर करणारे… काही काळातच नव्या वर्षाचे आगमन होईल. मात्र त्याची तयारी याच काळात सुरू होते. हे दिवस नवपरिणित जोडप्यांच्या डोळ्यांत स्वप्नांची रांगोळी रेखणारे असतात. प्रतिभावंतांची प्रतिभा जागवतात आणि कलाकारांच्या सर्जनशीलतेला साद देतात, म्हणूनच ते सुखद, सुमंगल आणि लाघवी आहेत. तेव्हा नेहमीच्या धबडग्यातून बाहेर पडत थोडे विसावू या. या सुंदर काळाचा आनंद लुटू या.