सतीश पाटणकर
कौपिनेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक मंदिर आहे. हे मंदिर मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकांत उतरल्यावर पश्चिमेला टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मासुंदा तलावाच्या विरुद्ध दिशेला आहे. राज्यभरात असलेल्या सर्वच मंदिरांमधल्या शिवलिंगांपैकी या मंदिरात असलेले हे शिवलिंग सर्वात मोठे असून चार फूट तीन इंच एवढ्या उंचीचे आहे. देशभरात देशाच्या बाहेर यापेक्षा मोठे शिवलिंग असू शकते, मात्र महाराष्ट्रात असलेल्या सर्व मंदिरांमध्ये या आकाराचे शिवलिंग कुठेही पाहायला मिळत नाही. कौपिनेश्वर मंदिराला ठाण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. कौपिनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकरांचे मंदिर नसून, पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरे देखील आहेत. त्यामुळे दत्तजयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले जातात. शंकराची पिंडी असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे. मात्र बाकी मंदिरे कालांतराने भाविकांनी बांधली आहेत. जागेचा परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे. त्यामुळे मंदिरांची जागा सोडून अन्य आवार अतिशय मोठे आहे. शहराच्या मध्यवस्तीत असूनही येथील वातावरणावर गर्दीचा परिणाम होत नाही.
इसवी सन १६६३ मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर मासुंदा तलावाकाठी शिलाहारांनी बांधलेली बारा मंदिरे नष्ट केली. त्यावेळी पोर्तुगीजांनी मासुंदाचे नाव बदलून लेक आॅफ सेंट अॅन्थनी असे ठेवले होते. मासुंदा तलाव ३४ एकरांवर पसरलेला होता. इसवी सन १८८१ मध्ये मासुंदा तलाव साफ केला होता तेव्हा तलावात भग्न मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष सापडले. इसवी सन १७६० मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी कौपिनेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि एक भव्य दगडी मंदिर बांधले. कौपिनेश्वराच्या गाभाऱ्यात ४ फूट इंच उंचीचे आणि बारा फुटांचा घेर असलेले शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात शिवलिंगाला शोभेल असा भव्य नंदी आहे. मंदिराच्या परिसरात शितलादेवी, कालिकामाता, दत्तात्रेय, हनुमान, श्रीराम यांची मंदिरेही आहेत. इसवी सन १९१७ मध्ये मंदिराच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या उपस्थितीत गोभक्त संमेलन भरले होते. श्रावण महिन्यातला सोमवार म्हटले की, ठाणेकरांना ओढ लागते ती ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या कौपिनेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या दर्शनाची. कौपिनेश्वर मंदिराचा साधारण १७६० मध्ये म्हणजेच १७ व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सुमारे हजार ते अकराशे वर्षांचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण राज्यभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी तीळातीळाने येथील शंकराची पिंडी मोठी होते, अशी भाविक आख्यायिका सांगतात. त्यामुळे भाविक आवर्जून येथे दर्शनासाठी येत असतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)