भारताचा डोम्माराजू गुकेश नवा बुद्धिबळ जगज्जेता ठरला. सिंगापूर येथे गुरुवारी फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १४व्या आणि अंतिम डावात गतविजेता चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट देत त्याने जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर संपूर्ण भारतात अनोख्या जल्लोषाला सुरुवात झाली. स्पर्धेच्या १३८ वर्षांच्या इतिहासात १८ वर्षीय गुकेश हा जगातील सर्वात तरुण विजेता ठरला. याबाबत त्याने माजी विजेते, महान खेळाडू रशियाचे गॅरी कास्पारोव्ह यांना मागे टाकले. आपले महान खेळाडू आणि माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन बनलेला गुकेश हा भारताचा केवळ दुसरा बुद्धिबळपटू आहे. गुकेश हा पाच वेळा विश्वविजेता आनंद यांचा शिष्य आहे. आनंद यांच्या वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतो. आनंद यांनी २०००मध्ये पहिल्यांदा भारतात जगज्जेतेपदाची ट्रॉफी आणली. त्यानंतर २००७ ते २०१३ या कालावधीत चार असे एकूण विक्रमी वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी त्यांच्या शिष्याने ही अनोखी कामगिरी साकारली. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात विश्वविजेती ठरलेली आनंद-गुकेश ही जगभरातील पहिलीच जोडी आहे.
कुठल्याही खेळात जगज्जेतेपद मिळवणे सोपे नसते. फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धाही त्याला अपवाद नाही. यंदा सिंगापूरमध्ये १७ दिवस रंगलेल्या जागतिक स्पर्धेत डिंग आणि गुकेश यांच्यात चुरशीची लढत झाली. गतविजेता लिरेन जेतेपद राखण्यासाठी उत्सुक होता. या वर्षाच्या सुरुवातीला झालेली चॅलेंजर्स स्पर्धा जिंकून गुकेशने प्रबळ दावेदारी पेश केली. यंदाच्या स्पर्धेत १४ पैकी चार डाव निकाली ठरले, तर दहा डाव बरोबरीत (ड्रॉ) झाले. डिंग लिरेनने पहिला डाव ४२व्या चालीमध्ये जिंकताना आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या डावात पिछाडीवरून गुकेशने स्वतःला सावरले. हा डाव बरोबरीत सुटला. त्यानतंर गुकेशने तिसऱ्या डावात ३७व्या चालीमध्ये विजय मिळवून जबरदस्त पुनरागमन केले. तोडीसतोड खेळाचे प्रदर्शन झाल्याने चौथा ते दहा असे सलग सात डाव बरोबरीत सुटले. ११व्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना गुकेशने प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडत २९व्या चालीमध्ये मात दिली. मात्र, पुढच्याच डावात डिंगने पलटवार करताना विजय मिळवला. १३व्या डावात दोघांनीही सावध पवित्रा घेतला. तेव्हा लिरेन आणि गुकेशच्या खात्यात प्रत्येकी ६.५ गुण होते. त्यामुळे १४व्या आणि अंतिम डावाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. निर्णायक डावात गुकेशने काळ्या सोंगट्यांसह खेळूनही बाजी मारली. हा डाव बरोबरीकडे झुकणार असे वाटत होते; परंतु ५५व्या चालीत लिरेनने मोठी चूक केली. ज्याचा फायदा उठवत गुकेशने ७.५-६-५ अशा फरकाने पहिल्या-वहिल्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
गुकेशच्या जागतिक यशात स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अपटन यांचा मोठा वाटा आहे. अपटन यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताच्या क्रिकेट संघाने २०११ वनडे विश्वचषक आणि २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. गुकेशसारख्या युवा खेळाडूला मदत करत पॅडी अपटन यांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणे प्रत्येक बुद्धिबळपटूसाठी खडतर मानले जाते. अनेकदा हा सामना फक्त तुम्ही शिकलेल्या चालींचा नाही, तर मानसिकतेचाही होतो. मॅग्नस कार्लसनसारखा विख्यात बुद्धिबळपटूही आपली पहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळत असताना थोडासा विचलीत झाला होता. डिंग लिरेनला आव्हान देत असताना विजेतेपदासाठीच्या लढतीत गुकेशला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. पहिल्याच सामन्यात झालेला पराभव आणि त्यानंतरच्या सामन्यात विजय शक्य असतानाही झालेला पराभव गुकेशसाठी धक्कादायक होता; परंतु यानंतर गुकेशने जो खेळ केला तो निव्वळ अविश्वसनीय होता. तुम्हाला एखाद्या परीक्षेत चांगली कामगिरी करायची असेल तर संपूर्ण पुस्तकाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तेव्हाच तुम्ही परीक्षेत आत्मविश्वासाने जाऊ शकता. केवळ आशेच्या जोरावर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही.
स्पर्धेदरम्यान किती वेळ झोपायचे, पिछाडीवर किंवा दबावाखाली स्वतःला कसं सावरायचे तसेच प्रत्येक क्षणांचा कसा सामना करायचा याचा अभ्यास करून गुकेश अंतिम सामन्यात उतरला होता. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्याने जगज्जेतेपदावर नाव कोरले, हे अपटन यांनी गुकेशच्या मेहनतीबद्दल केलेले भाष्य खूप काही सांगून जाते. प्रत्येक खेळाडूने त्याप्रमाणे स्वतःला घडवायला हवे. मूळचा चेन्नईचा असलेल्या गुकेशचे आई-वडील उच्चशिक्षित आहेत. त्याची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वडील डॉक्टर आहेत. मात्र, गुकेशला त्याच्या आई-वडिलांच्या क्षेत्रापेक्षा बुद्धिबळमध्ये अधिक रूची होती. सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात करणाऱ्या गुकेशने केवळ ११ वर्षांच्या कालावधीत वर्ल्ड चॅम्पियन बनून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यल्प काळात मिळवलेले यश त्याची मेहनत, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता दर्शवते. जेतेपद पटकावल्यानंतर गुकेश भावुक झाला. त्याला आनंदाश्रू अनावर झाले. स्पर्धा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पुन्हा बुद्धिबळाचा पट जसा मांडतो तसा मांडला आणि त्याला नमस्कार केला. ही आपली संस्कृती आहे. परंपरा आहे. ती त्याने परदेशातही जपली. गुकेश हा जगज्जेतेपदामुळे युवा पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत बनला आहे. आपल्याकडे अठरावं वरीस धोक्याचे मानले जाते. कारण मुले सज्ञान होतात. या वयात बिघडण्याचा धोका अधिक असतो. मात्र, अठरावे वर्ष हे विश्वविक्रमाचे असते, हे डोम्माराजू गुकेशने दाखवून दिले.