Thursday, October 30, 2025
Happy Diwali

वाहतो ही दुर्वांची जुडी'ची ६० वर्षे...

वाहतो ही दुर्वांची जुडी'ची ६० वर्षे...

राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाट्यकृती येत असल्या आणि त्यातून रसिकांचे मनोरंजन होत असले; तरी काही नाट्यकृती मात्र संस्कारक्षम म्हणून कायम ओळखल्या गेल्या. यातलीच एक माईलस्टोन नाट्यकृती म्हणजे 'वाहतो ही दुर्वांची जुडी'. नवाक्षरी शीर्षक ही ज्यांच्या नाटकांची खासियत होती, असे ज्येष्ठ रंगकर्मी बाळ कोल्हटकर यांच्या या नाटकाने रसिकजनांवर योग्य संस्कार घडवण्याचे कार्य करून ठेवले असून, यंदा या नाटकाला तब्बल ६० वर्षे झाली आहेत.

बाळ कोल्हटकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही 'दुर्वांची जुडी' सन १९६४ मध्ये प्रथम रंगभूमीवर आली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात स्वतः बाळ कोल्हटकर यांच्यासोबत आशा काळे यांनी भूमिका रंगवली होती. त्यांच्यासमवेत गणेश सोळंकी, अनंत मिराशी आदी कलावंतही या नाटकात होते. त्यावेळी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक अशी तिहेरी जबाबदारी स्वतः बाळ कोल्हटकर यांनी सांभाळली होती. नाट्यपंढरी सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. 'नाट्यमंदिर' या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकातल्या सुभाष, पठाण, बाळू आपटे, रंगराव आदी पात्रांनी रसिकजनांवर मोहिनी घातली होती.

त्यानंतरच्या काळात इतर काही संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. सन १९८४ मध्ये विजय गोखले आणि निवेदिता सराफ यांच्या अभिनयाच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर आले होते. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे या नाटकाने जेव्हा वयाची पन्नाशी गाठली; तेव्हा अंशुमन विचारे आणि शलाका पवार या दोघांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मूळ तीन अंकी असलेले हे नाटक तेव्हाही परंपरा राखत थेट तीन अंकात सादर झाले होते.

Comments
Add Comment