मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेचा विषय बनला आहे.विनोद कांबळी हा सध्या वाईट कारकिर्दीतून जात आहे.आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टिने तो अडचणीत आला आहे. त्याची ही परिस्थिती मुंबईत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून समोर आली आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी १९८३ च्या वर्ल्ड कपच्या सहकाऱ्यांसह कांबळीला पुनर्वसनासाठी मदतीची ऑफर दिली. परंतु त्यासाठी त्याच्यापुढे एक अट टाकली. विनोद कांबळीने दारु सोडल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची तयारी कपिल देव यांनी दर्शवली. कपिल देव यांची ही ऑफर विनोद कांबळी याने स्वीकारली आहे.
विनोद कांबळीने नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली. यादरम्यान त्याने कपिल देव यांची ऑफर स्वीकारली आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. कांबळी म्हणाला, दारु सोडण्यासाठी मी रिहॅब (व्यसनमुक्ती केंद्र) केंद्रात जाण्यासाठी तयार आहे. माझा परिवार माझ्या सोबत आहे.विनोद कांबळी यापूर्वी १४ व्या वेळा रिहॅब केंद्रात जाऊन आला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. आता कपिल देव यांची ऑफर स्वीकारत तो १५ व्यांदा रिहॅब केंद्रात जात आहे. कांबळी याने सांगितले की, सध्या त्याला युरिन इंफेक्शनचा त्रास होत आहे. त्यामुळे मागील महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सध्या त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्याकडे लक्ष ठेवत आहे. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपयांच्या पेन्शनवर त्याचे कुटुंब चालत आहे.
विनोद कांबळीने २००९ मध्ये सचिन तेंडुलकरसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याने शालेय मित्र असलेल्या सचिनवर मदत न करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमधील संवाद बंद झाल्याचे सांगितले जात आहे. २०१३ मध्ये सचिनने निवृत्ती घेतली. त्यात निरोप समारंभाच्या भाषणात सचिनने विनोद कांबळीचा उल्लेख केला नव्हता.काही दिवसांपूर्वी जेव्हा दोघे भेटले तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कांबळी १५ वर्षांनंतर आता त्या वादावर बोलला आहे.मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, तेव्हा मी खूप निराश झालो होतो. म्हणूनच मी ती गोष्ट बोललो. सचिनने पुरेशी मदत केली नाही असे मला वाटले. कांबळीने खुलासा केला की, २०१३ मध्ये सचिनने त्याच्या दोन शस्त्रक्रियांसाठी पैसे दिले होते. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असे कांबळीने सांगितले आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.