सातारा : राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री काळुबाई देवीची यात्रा (Mandhardevi Kalubai Yatra) दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. लाखो भाविक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेची तारीख समोर आली आहे.
Coolie South Movie : ३० वर्षांनंतर आमिर आणि रजनीकांतची जोडी झळकणार मोठ्या पडद्यावर!
यावर्षी काळुबाईची यात्रा येत्या १२ जानेवारी रोजी देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस १३ जानेवारीला असणार आहे. ही यात्रा १२ ते १४ जानेवारी या कालावधीत भरणार आहे. अशातच यात्रा अवघ्या महिनाभरावर येवून ठेपली असून यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे, अशी माहिती मांढरदेव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता
देवीच्या यात्रेसाठी कापूरहोळ- भोर- आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोयस्कर ठरणार आहे. अन्यथा भाविकांना शेकडो किलोमीटर लांब पल्यावरून वाईमार्गे देवीच्या यात्रेला आर्थिक नुकसान सहन करून जावे लागणार आहे.
सध्या भोर -आंबाडे-आंबाडखिंड घाट रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू ३१ डिसेंबर पर्यंत हे काम सुरू राहणार आहे.एक महिन्यावर येऊ घातलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेसाठी ३१ डिसेंबर पासून वाहतुकीस रस्ता पूर्णपणे खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग भोर उपविभागीय अभियंता राजेसाहेब आगळे यांनी सांगितले आहे.