मुंबई : भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. तिकीट आरक्षित करून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही जणांची तिकिटे वेटिंगवर असतात तर काहींना आरएसी तिकीट मिळते. आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना सुविधा मिळत नव्हती.
रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेट आणि उशी दिली जात नव्हती. आता हे सर्व सामान आरएसीधारकांना मिळणार आहे. तसेच आरएसी तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. आता या प्रवाशांना कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे. कोच अटेंडेंट बर्थवर पोहोचल्यावर प्रवाशांना बेडरोल देणार आहे. यामुळे कन्फर्म तिकीटधारक आणि आरएसी तिकीटधारक यांच्यातील भेदभाव संपणार आहे. रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जातात; परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नव्हत्या.