नवी दिल्ली : तरुणांमध्ये वाढत चाललेले मद्यपानाचे प्रमाण पाहता दिल्ली सरकारने मद्यपानाचे वय निश्चित केले आहे. यापुढे २५ वर्ष आणि त्यावरील लोकांनाच मद्यपान करता येणार आहे. तसेच मद्यपानासाठी मद्यपींना वय नमूद असलेले ओळखपत्र किंवा पुरावा द्यावा लागणार आहे. दिल्ली सरकारने हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट, परमिट रूमधारकांसाठी निर्देश जारी केले आहेत.
दिल्लीतील उत्पादन शुल्क खात्याला नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. अल्पवयीन मुलेही मद्यपान करीत असल्यामुळे वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. मद्यपींना ओळखपत्र दाखविल्याशिवाय दिल्लीमध्ये मद्यपान करण्यास परवानगी मिळणार नाही. अल्पवयीन अथवा २५ वर्षांच्या आतील मुलांना मद्यविक्री केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. परवानाधारक अथवा त्यांच्या कर्मचार्यांना नव्या अटींचे पालन करावे लागणार आहे. दिल्लीतील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्ली सरकारने परिपत्रक धाडले आहे.
उत्पादन शुल्क खात्याने वयाची खातरजमा करण्यासाठी मद्यविक्री परवानधारकांसाठी नवीन अॅप सुरू केले आहे. डीजीलॉकर अॅपद्वारे परवानाधारकांना मद्यपींच्या वयाची खातरजमा करता येणार आहे. भौतिक आयडीचा वापर केल्यानंतर मद्यपीचे वय २५ वर्षांपेक्षा जादा आहे की लहान हे समजण्यास मदत होणार आहे.
मद्यसेवनासाठी २१ व २५ वयाची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य क्षमतेचे मद्यसेवन करण्यासाठी २१ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तर ‘हार्ड ड्रिंक’ करण्यासाठी २५ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मद्य वाहतुकीसाठीही हाच नियम लागू आहे. कायद्यानुसार, महाराष्ट्रात दारू खरेदी करण्यासाठी, बाळगण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा सेवन करण्यासाठी मद्य परमिट आवश्यक आहे. तसेच २५ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या आरोग्याची जपणूक आणि देखभाल करण्यासाठी मद्य परमिट मिळविण्यास पात्र आहे. परवानाशिवाय मद्य खरेदी करणे, सेवन करणे हा ‘बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत गुन्हा आहे.