रंजना मंत्री
शिक्षणाचा श्रीगणेशा वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सुरू होतो. शिक्षणाचा हा प्रवास आपल्या पसंतीच्या क्षेत्रात काम सुरू केल्यावर थांबतो. या प्रवासातील महत्त्वाच्या नाक्याचे ठिकाण म्हणजे क्षेत्रात शिकण्यासाठी प्रवेश घेणे. त्याआधी प्रवेश परीक्षेला त्याला सामोरे जावे लागते. या बाबतीत असे दिसून आले आहे की, या प्रवेश परीक्षांना बसणारे विद्यार्थी आणि प्रत्यक्ष उपलब्ध जागा यात फार मोठी तफावत असते. त्यामुळेच विद्यार्थांची मार्क मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होते. म्हणूनच विद्यार्थांना कोचिंग क्लासेसचा आधार घ्यावा लागतो.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात; परंतु अंतर्गत स्पर्धेमुळे प्रचंड दबाव येऊन त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे त्यात भरच पडते. म्हणूनच केंद्रिय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मध्यंतरी यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या दिल्लीतील एका कोचिंग क्लासला तीन लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. या जाहिरातीतून यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये २००हून अधिक विद्यार्थांची निवड झाली आणि यूपीएससी/आयएस परीक्षेच्या तयारीसाठी भारतातील ‘आमचा क्लास प्रथम क्रमांकाचा आहे’ असे दावे केले होते. शेवटी ते दिशाभूल करणारे ठरले.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेतून २०२२ साली एकंदर ९९३ उमेदवारांची निवड झाली होती. अकरा क्लासेसनी मिळून तब्बल ३,६३६ विद्यार्थांची निवड झाल्याची जाहिरात केली होती. तसेच २०२३ सालच्या परीक्षेतून १०१६ विद्यार्थ्यांची निवड झालेली असूनही नऊ क्लासेसनी मिळून ३,६३६ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे दावे जाहिरातीमधून केले होते. गंमत म्हणजे काही विद्यार्थांचे चेहरे सरसकट सगळ्याच जाहिरातीमधून झळकवले होते. यामागचे कारण असे होते की, विद्यार्थी वेगवेगळ्या सत्रासाठी वेगवेगळ्या क्लासला जात असतात; परंतु जाहिरात करताना आपल्या क्लासला हा विद्यार्थी कोणत्या सत्रासाठी येत होता, याचा मात्र उल्लेख जाहिरातीत केला जात नाही. त्यामुळे त्या विद्यार्थांच्या यशाचे संपूर्ण श्रेय हे कोचिंग क्लास जाहिरातीमधून स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करत असतात. केंद्रिय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून या कारणावरून ‘सो मोटु’ अंतर्गत ४५ नोटीस बजावत अठरा कोचिंग क्लासेसना मिळून ५४.६ लाख रुपये एवढा दंड आकारला गेला. या कारवाईमुळे आता अशा जाहिरातींना चाप बसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात नेमकी व खरी माहिती पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय ग्राहक
संरक्षण प्राधिकरणाकडून खालील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
१.• यशाची हमखास खात्री किंवा निवड होण्याची खात्री अशी हमी देणारी जाहिरात करण्यास मनाई
२.• जाहिरातीमधून यशस्वी विद्यार्थाचे नाव व फोटो देताना त्याने त्यांच्या कोणत्या सत्रात प्रवेश घेतला होता व ते सशुल्क होते का तसेच त्याला मिळालेला गुणानुक्रम कोणता हे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
३.• यशस्वी उमेदवार अशा जाहिरातीसाठी पैसे घेणार असेल तर त्याने सरकारी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
४.• जाहिरातीमधून दिसणारा विद्यार्थी अल्पवयीन असेल, तर त्याचे अनुभव व छायाचित्र वापरण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
५.• कोचिंग क्लासेसची जाहिरात करताना त्यातून मिळणाऱ्या सेवा, सोयी पायाभूत सुविधा, साधने यांचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
६.• प्रदर्शित केलेल्या जाहिरातीबाबत जर काही सूचना (डिस्क्लेमर/अस्वीकरण) केलेल्या असतील तर त्या स्पष्ट आणि ठळक अक्षरात करणे आवश्यक आहे.
७.• जाहिरातीमधून प्रवेश घेण्यासाठी घाई करणारी किंवा काही दिवसांचीच मुदत अशी विधाने करण्यास मनाई.
८.• जाहिरातीमधून जी व्यक्ती किंवा सेलेब्रिटी जे विधान करेल त्यासाठी ती पूर्णपणे जबाबदार धरली जाईल.
प्राधिकरणाच्या नियमानुसार वरील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरांतीवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच हे वरील सर्व नियम ५० किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या कोचिंग क्लासेसना लागू पडतात व काऊन्सिलिंग, क्रीडा व नृत्य या क्षेत्रासाठी बंधनकारक नाहीत. मिनीस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेयर्स विभागांतर्गत नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन (१९१५) या सरकारी पोर्टलकडे या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरोधात दर्ज झालेल्या तक्रारींचे विश्लेषण करूनच वरील मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. या पोर्टलकडे २०२१-२२ मध्ये ४,८१५ तक्रारी, २२-२३ मध्ये ५,३५१ तसेच २०२३-२४ मध्ये १६,२७६ तक्रारी आल्या. यातील ६,९८० तक्रारींचा निवाडा झाला. तक्ररींचा हा वाढता आलेख लक्षात घेता या हेल्पलाईनची विश्वासार्हता लक्षात येते. म्हणूनच कोचिंग क्लासेसना त्यांच्याकडील विद्यार्थांना आवश्यकतेनुसार या पोर्टलचा वापर करण्याची मोकळीक असावी असे बंधन घालण्यात आले आहे.
ही पार्श्वभूमी पाहता नेमक्या कोणत्या क्लासमध्ये आपण ऑडिशन घ्यावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना नक्कीच पडेल. प्रवेश परीक्षेची पूर्व तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासची संख्या अगणित आहे. त्यामुळे तयार झालेल्या स्पर्धेचा कोचिंग क्लास पूर्ण फायदा उठवतात. तुम्हाला आमच्याकडील शिकवणीने हमखास यश प्राप्त होणार असे दावे करत त्यांच्या क्लासेसबद्दल जाहिरात करत असतात. त्यासाठी यशस्वी विद्यार्थांचे फोटो झळकवत त्यांच्या अनुभवाचा वापरही या जाहिरातीमधून केलेला असतो. यालाच भुलून पालक आपल्या पाल्यासाठी त्या विशिष्ट कोचिंग क्लासची निवड करतात. कित्येकदा हे दावे दिशाभूल करणारे असतात आणि त्यांच्या पदरात निराशा पडते असे सिद्ध झाले आहे. आपला भारत देश तरुणांचा देश गणला जातो. उच्च शिक्षण घेऊन आपली कर्तबगारी सिद्ध करणारा तरुण देशाचे भवितव्य घडवत असतो. त्यासाठी त्याला पैसा व काही वर्षे खर्च करावी लागतात. अशा वेळी शिक्षणाच्या व्यावसायिक क्षेत्रात या दिशाभूल करणाऱ्या अनुचित व्यापारी पद्धतीमुळे तो मार्ग चुकू शकतो ज्याचा परिणाम त्याच्या करिअरवर व पर्यायाने देशावर होऊ शकतो. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात माहितीचा, निवडीचा हक्क तसेच तक्रार निवारण करून घेण्याच्या ग्राहक हक्कांबाबत जागरूक राहूनच पावले टाकावीत.