आमदार निलेश राणे यांच्या पत्राची पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घेतली दखल
सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार निलेश राणे यांची अनधिकृत भोंग्या संदर्भात दिलेल्या पत्राची कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तात्काळ दखल घेतली. कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्वधर्मीयांची बैठक आयोजित करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत या बैठकीत दिले. कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या अन्यथा कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना अनधिकृत धार्मिक भोंगे संदर्भात कारवाई करण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती. सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने दोन्ही प्रदूषणांविषयी नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री ४० तर दिवसा आवाजाची मर्यादा ५० डेसिबल इतकी असावी. भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही. मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेऊन व वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे. मात्र, अजान देताना त्याचे पालन होत नाही. त्यामुळे अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनी प्रदूषण या संदर्भात कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यांवर धडक कारवाई करावी अशी मागणी राणे यांनी केली होती. ही मागणी केल्याच्या २४ तासाच्या आत मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी सायंकाळी आयोजित केली होती. यात मगदूम यांनी मार्गदर्शन आणि काही सूचना केल्या.
Economy : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार राज्य शासनाने २०१७ मध्ये आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार कोणत्याही समारंभामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डीजे, ढोल पथक असेल तर त्याची परवानगी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा मंदिर मस्जिद किंवा अन्य ठिकाणी स्पीकर लावायचे असेल तर परवानगी घेणे गरजेचे आहे. यापुढे अशा परवानगी घेतल्या गेल्या नाही आणि शासनाने ठरवलेल्या आवाजाच्या मर्यादेबाहेर स्पीकर आवाज असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल होईल असे त्यांनी सांगितले. तसेच कायमस्वरूपी ज्यांचे स्पीकर मंदिर, मस्जिदवर आहेत. त्यांनी दर तीन महिन्यांनी परवानगी घेऊन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्वधर्मीय उपस्थित होते.