एक काळ होता आंबा म्हटला की, देवगड हापूस, रत्नागिरी हापूसची एक वेगळी ओळख होती. हापूस आंब्याचा स्वाद आणि त्याची टेस्ट याचं एक वेगळेपण होतंच. आजही हे वेगळेपण आहेच; परंतु सध्याचं स्पर्धेच युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी फार काळजी घ्यावी लागते. अन्यथ: आपणाला कळत नाही. आपण होतो कुठे? आणि आज कुठे आहोत. यामुळेच आज कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी अधिक सतर्क, सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. कोकणातील हापूस आंब्याचा असलेला पूर्वीच्या तुलनेत आज कुठलाही आंबा देवगड-रत्नागिरीचा हापूस आंबा म्हणून विक्रीला ठेवला जातो. कर्नाटक राज्यात गेल्या दहा-पंधरा वर्षांत आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आणि विशेष म्हणजे कर्नाटकचा हापूस आंबा देवगड, रत्नागिरी हापूस म्हणून मोठ्या प्रमाणात विकला जातो.
दुर्दैवाची बाब म्हणजे कोकणातील हमरस्त्यांवर हे कर्नाटकी आंबा स्टॉलवरून विक्री होते आणि हे सर्व राजरोसपणे घडत असताना कोकणातील बागायतदार शेतकरी मात्र पाहत बसतो. देवगड हापूसच्या बॉक्समध्ये दिमाखात कर्नाटकचा हापूस असतो आणि कोकणातील मुंबईकर आणि राज्यातील अन्य प्रांतातील लोकही हा कर्नाटकचा हापूस आंबा देवगडचा हापूस आंबा म्हणून खरेदी करतात. दुर्दैवाने याबाबत सातत्याने चर्चा होते; परंतु त्याबाबतीत आंबा बागायतदार शेतकरी आजही सजग नाही. देशभरातील विविध राज्यातून मुंबई, पुणे, बंगळूरु आदी मोठ्या शहरातून आंबा विक्रीला येतो. याचा अर्थ स्पर्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लोकांना रासायनिक खतांवर उभ्या राहिलेल्या बागायतीतून होणारा आंबा जगाच्या बाजारात नको आहे. सेंद्रिय खतांवर ज्या बागायती आहेत त्या बागायतींमधील आंब्यासाठी वेगळा आणि अधिकचा दर निश्चित मिळू शकतो. त्यासाठी त्या त्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी बाजारात विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे, ती टिकवली पाहिजे. भाजीपाल्याच्या बाबतीतही सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकचे दर मिळत असतात. द्राक्ष बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणांवर रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर केलेला असतो. जर आपण द्राक्षाच्या घडांकडे नीट बारकाईने पाहिले तर बुरशीसारखे थर साचलेले दिसतात. यावरून कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा किती वापर करण्यात आला असेल हे सहज समजून येऊ शकते; परंतु द्राक्ष बागायत देखील सेंद्रिय खतांवर उभ्या केलेल्या बागा द्राक्ष पिकवणाऱ्या भागात आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादिक केलेल्या द्राक्षांचे दर हे निश्चितच अधिकचे आहेत; परंतु यातून द्राक्ष उत्पादक शेतकरीही अधिकचे पैसे कमावतो ही वस्तुस्थिती आहे. आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी हा दृष्टिकोन ठेऊन आंबा बागायत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे त्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल. नवी मुंबईच्या आताच्या फळ, भाजीपाला मार्केटमध्ये जे दलाल आहेत ते सर्वाधिक दलालीच्या व्यवसायात पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये आंबा दलाल हे जुन्नर भागातील दिसून येतील. आता याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात बागायतदार शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा निर्माण केल्या आहेत. पूर्वी असं म्हणायचे की, कोल्हापूरला नारळ होत नाहीत ते फक्त समुद्र किनाऱ्यावरच नारळ पीक चांगलं होतं असं म्हटले जायचं. परंतु आता कोल्हापूर, जयसिंग दरम्यान महामार्गावर नारळाच्या मोठ्या बागा उभ्या झाल्या आहेत. यामुळे कुठे काय होतय किंवा होऊ शकत हे आता कुणाला ठरवता येणार नाही. तसंच जुन्नरच्या बागायतदारांनी हापूस आंब्याची लागवड केली. अर्थात हापूस आंबा हे काही चार-दोन दिवसांत आंबा बागायती उभ्या झालेल्या नाहीत, तर त्यासाठी पंधरा-वीस वर्षे त्यासाठी प्रयत्न आणि लागणारी मेहनत निश्चितच घेण्यात आली आहे. आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातून शिवनेरी हापूस तयार झाला आहे. जुन्नरच्या या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून नवी ओळख निर्माण करीत या आंब्याला शिवनेरी हापूस आंबा म्हणून पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी, कोकणातील आंबा व्यावसायिक या सर्वांशी पुरंदर, जुन्नर या भागातील आंबा व्यापारातील दलालांशी संबंधित सर्वजण या सर्वांमध्ये जोडले आहेत. जुन्नर भागातील मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील आंबा व्यावसायातील दलाल हे कोकणाशी जोडले. व्यावसायिक पातळीवर जोडले गेले आहेत. यामुळे साहजिक हापूस आंब्याचं मानांकन मिळवणारा जुन्नरचा हा शिवनेरी हापूस वेगळेपण जपत मार्केटमध्ये नाव कमावण्यासाठी निश्चितच स्पर्धा केल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी जागृक राहिले पाहिजे. स्पर्धा ही जगभरात असणारच आहे. खुल्या बाजारपेठेच्या आजच्या जगात स्पर्धा ही निश्चित असणारच आहे. त्यामुळे ती काही एकट्या हापूस आंब्याच्या बाबतीतच असणार असे नाही. ही स्पर्धा सर्वत्रच आहे आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जा आणि गुणात्मकता याला महत्त्व देत आपल्याकडील हापूस आंब्याला जपण्याची खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. अन्यथ: आपणच कोकणातला हा हापूस त्याची ओळख विसरून जाऊ तसं होऊ न देण्यासाठी आंब्याशी संबंधित आंबा बागायतदार शेतकरी, आंबा व्यावसायिक या सर्वांनीच फार काळजी घेत आंबा व्यावसाय पुढे नेला पाहिजे आणि कोकणाच्या आर्थिक समृद्धीत हातभार लावला पाहिजे.
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…