Monday, May 12, 2025

नाशिक

Shirdi Sai Temple : थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षण; २० डिसेंबर रोजी साई मंदिर राहणार पावणेतीन तास बंद

Shirdi Sai Temple : थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षण; २० डिसेंबर रोजी साई मंदिर राहणार पावणेतीन तास बंद

शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील साईबाबांची संगमरवरी (इटालियन मार्बल) मूर्तीचा पुरातत्व विभागाकडून थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षित करण्यासाठी दर्शनात तात्पुरता बदल करण्यात आला असून शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी पावणेतीन तास साई मंदिर बंद असणार असल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील इटालियन मार्बल असलेली श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवार दि. ७ ऑक्टोबर १९५४ रोजी करण्यात आली असून या घटनेला आजरोजी ७० वर्ष पूर्ण झाली आहे.साई मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीवर नित्यानेमाने होणाऱ्या पूजा अर्चा दुग्धभिषेक यामुळे भविष्यात मूर्तीची झिज होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत मूर्तिकार तालीम यांनी तयार केलेल्या श्री साईबाबांच्या मूर्तिमध्ये काहीच फरक पडलेला नाही.



तरीही कुठे इजा किंवा असा प्रसंग उद्भवल्यास या थ्रीडी स्कॅनवरून मूर्तिचे संवर्धन करू शकतो.म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्या संगमरवरी (इटालीयन मार्बल) मूर्तीची थ्रीडी स्‍कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी (पुरातत्व विभाग) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे स्‍थापन करणेत आलेल्या विविध तज्ञ समिती मधील सदस्य दि.२० डिसेंबर रोजी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देवून पाहणी करणार आहेत. त्यामुळे दि.२० रोजी दुपारी १.४५ ते ४.३० या पाऊण तासाच्या दरम्यान साई समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.


याची सर्व भाविक भक्‍तांनी नोंद घ्यावी व त्यानुसार आपली यात्रा योजना आखावी असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले असून याकामी साईभक्तांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment