Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखकंत्राटी पद्धतीमुळे सुरक्षितता धोक्यात

कंत्राटी पद्धतीमुळे सुरक्षितता धोक्यात

मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून टाकले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, ४९ जण जखमी झाले. घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. बसचालकाला अटक झाली असली तरी, काही दिवसांनंतर तो जामिनावर बाहेर येईल. बेस्ट चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला की, त्याची इतर कारणे आहेत, हे चौकशीत समोर येईलच. मात्र या अपघाताचे खरे कारण शोधण्याबरोबर अन्य कारणे काय आहेत त्याचीही मुळापासून सखोल चौकशी करण्याची गरज आहे. ऑटोमॅटिक बसचा पुरेसा अनुभव नव्हता, असे बेस्ट वाहनचालकाने चौकशीत कबूल केले. त्याने गोंधळून क्लच समजून एक्स्लरेटर दाबले. या अपघातामुळे बेस्ट प्रशासन चालकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमी अनुभव असलेल्या चालकांची निवड आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे कुर्ला दुर्घटनेची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षांत अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. त्यात सोमवारी कुर्ल्यात हादरवणाऱ्या या घटनेनंतर संताप अधिक वाढला आहे. कुर्ला येथील बेस्ट अपघातानंतर बेस्टच्या कंत्राटीकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटीकरणाविरोधात आवाज उठवला जात असला तरी त्याकडे दुर्लक्ष करीत बेस्टमध्ये १०० टक्के कंत्राटीकरणाचा प्रयत्न सुरू ठेवला होता. हा कंत्राटीकरणाचा डाव बेस्टच्या आता अंगलट आला आहे. कंत्राटदारांची मुजोरी, कमी वेतन त्यात कंत्राटदारांकडून वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचारी, चालकांमध्ये असंतोष आदी समस्या वाढत आहेत. कुर्ल्याच्या घटनेनंतर बेस्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईची लोकसंख्या सतत वाढत असताना बेस्ट बसची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. बेस्टने २ हजार १२६ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल २१६० बस भंगारात काढल्या, तर बेस्टच्या मालकीच्या केवळ १०६१ बस ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होत्या. बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी झाला आहे. बेस्ट बस व्यवस्थेच्या खासगीकरणामुळे

कायमस्वरूपी कर्मचारी आणि प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यात बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसतात. अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा करत असतात आणि अनेकदा अतिगर्दीमुळे बसमध्ये चढताही येत नाही, अशी परिस्थिती मुंबईकरांची नित्याची बाब झाली आहे. नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि परिवहनाच्या सुविधा चांगल्या प्रकारे देता याव्यात, ही प्रशासनाची जबाबदारी असते. देशातील छोट्या राज्याचा जेवढा अर्थसंकल्प असतो, त्यापेक्षाही अधिक मोठा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा आहे. बेस्ट प्रशासन हे मुंबई महापालिकेचे एक अंग असल्याने, माफक तिकीट दरात नागरिकांना प्रवासाचा लाभ देण्याचे भान प्रशासनाने ठेवले असले तरी, बस गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. तसेच बसचालक हा अनुभवी व प्रशिक्षित असावा, या साध्या गोष्टीकडे कानाडोळा होत आहे. त्याचे कारण कंत्राटी पद्धतीने बस गाड्या चालवायला दिल्याने बेस्टचे त्यावर नियंत्रण नाही. भाडेतत्त्वावरील बसचे कर्मचारी कमी पगारात काम करतात. एवढेच काय तर बसच्या देखभाल-दुरुस्तीचे ज्ञान नसल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भाडेतत्त्वावरील अनेक बसगाड्यांची दुरुस्तीच होत नसल्याने वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून बंद पडतात. अचानक बस ब्रेक डाऊन होण्याच्या घटनाही घडताना दिसतात. त्यात ‘बेस्ट’मध्ये कंत्राटी कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून, परिणामी बस गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या वर्षभरात अनेकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमावला आहे. त्यामुळे बेस्टमधील कंत्राटी पद्धत कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. कंत्राटी पद्धतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. दुसरीकडे मुंबईकरांना सुरक्षित आणि विश्वासार्ह, सार्वजनिक बस प्रवास अल्पदरात देण्याकरिता कंत्राटी पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी, याकडे कामगार नेते शशांक राव यांनी लक्ष वेधले आहे. कुर्ला परिसरात ज्या ठिकाणी अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर अनेक दुचाकी, चारचाकी वाहने उभी होती. फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे, पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. जर फुटपाथ मोकळा असता तर या दुर्घटनेतील काही व्यक्ती वाचल्या असत्या. मात्र ट्रॉफीक समस्या ही केवळ कुर्ल्यापुरती मर्यादित नाही, तर मुंबईतील अनेक रस्त्यांवर गाड्या पार्किंग केल्याने रस्ते अरुंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तसेच मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्थानकांच्या बाहेरील परिसर दृष्टिपथास आणण्यास फेरीवाल्यांकडून रस्त्यांवर अतिक्रमण केलेले दिसेल. कुर्ला अपघातानंतर मुंबई ट्रॉफीकची समस्या आणि फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण या समस्या बारकाईने पाहिल्यास दिसून येतील.

बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षांत अपघातांच्या घटना वाढत आहेत. बसेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस आल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १६० अपघात झाले. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वसामान्यांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. यामुळेच बेस्टचा सुरक्षित प्रवास आता इतिहासजमा झाला आहे, असे प्रवाशांना वाटू लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -