मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अमंलबजावणी नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०२५ पासून होण्याचे संकेत आहेत.
विधानसभा निवडणूकांपूर्वी सादर केलेल्या तिकीट भाडेवाढीच्या प्रस्तावात सरसकट १८ टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. आता यात सुधारणा करत नव्याने १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एसटी महामंडळात सन २०२१ पासून भाडेवाढ प्रलंबित आहे. निवडणूकांमुळे यंदा हंगामी भाडेवाढी ही रद्द करण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्याभागांच्या वाढलेल्या किंमती यांमुळे भाडेवाढ करणे गरजेचे आहे. नवा प्रस्ताव संचालक मंडळाच्या मान्यतेने सरकारकडे पाठवण्यात येईल. सरकारच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होणार आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावरून एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले प्रवाशांना झटका देण्याच्या तयारीत आहेत.
भंडारा विभागातील अपघात आणि कुर्ला बस अपघाताच्या धर्तीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन येथे तातडीची बैठक बोलावली होती. यात बस पुरवठादारांसह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटी अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण, मानसिक आरोग्य आणि वाहनांचे तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसूत्रीवर भर देणार असल्याचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले.एसटीच्या चालकांना दर ६ महिन्यांना उजळणी प्रशिक्षण दिले जाते. यात चालकांच्या मानसिक आरोग्यासह बस चालवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेत दाखल केले जाते. याच प्रमाणे खासगी चालकांनाही उजळणी प्रशिक्षण देण्याच्या सुचना बैठकीत अध्यक्ष गोगावले यांनी दिल्या आहेत.राज्यासह विभागातही एसटीला दिवसाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. ही तूट भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.