पाणबुडी पर्यटन अन् अंडरवॉटर म्युझियम
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर केंद्रातील भाजपा सरकारने महाराष्ट्राला घवघवीत निधीचे गिफ्ट दिले. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत सिंधुदुर्गमध्ये अंडर वॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रिफ आणि पाणबुडी पर्यटनासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; सागरी पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटन प्रकल्पामुळे या प्रदेशाचा कायापालट होईल.
जयदेवी पुजारी स्वामी
पर्यटन म्हणजे केवळ प्रवास आणि अनुभवांचा भाग नसून, पर्यटन म्हणजे आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. भारतासारख्या वैविध्यतेने नटलेल्या देशात तर पर्यटनाला चालना देणे म्हणजे आर्थिक विकासासोबतच इथल्या सांस्कृतिक वारशाला आणि नैसर्गिक संसाधनांना नवसंजीवनी देण्याचीही संधीच असणार आहे. त्यामुळेच तर देशभरातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात पर्यटन विषयक पायाभूत सुविधांमधल्या सुधारणा आणि विकासाच्या अानुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अशा निर्णयांच्या मालिकेतला अलीकडेच घेतला गेलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे, केंद्रीय पर्यटन मंत्रालायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर केलेला सागरी पर्यटन प्रकल्प. महत्त्वाचे म्हणजे यासाठी सरकारने ४६.९१ कोटी रुपयांच्या निधीचीही तरदूद केली आहे. खरे तर दीर्घकालीन परिघात पाहिले तर या निर्णयामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि त्याला समांतरपणे पर्यावरण संवर्धनाचे शाश्वत उद्दिष्टही साध्य व्हायला मदत मिळणार आहे.
देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २३ राज्यांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यातून ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली, ज्यासाठी ३,२९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. केंद्र सरकारने निवडलेल्या या ४० प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक आणि सिंधुदुर्ग या दोन प्रकल्पांचा समावेश केला गेला आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रकल्पासाठी ४६.९१ कोटी रुपये, तर नाशिकसाठी ९९.१४ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली गेली आहे.
सिंधुदुर्गातील पर्यटन संधी
सिंधुदुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीलगतच निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेनं नटलेला जिल्हा. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच्या या जिल्ह्यातली सागरी सौंदर्याची प्रतीकं म्हणजे तारकर्ली, मालवण, देवबाग आणि वेंगुर्ला यांसारखे मनमोहक समुद्रकिनारे. स्फटिकासारखं स्वच्छ पाणी, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यांमुळे या भागाचे सौंदर्य अधिकच खुलते.
सिंधुदुर्गच्या नैसर्गिक वैविध्यामुळे इथे साहसी पर्यटनाचीही मोठी संधी आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग आणि डॉल्फिन सफारी यांसारख्या जलक्रीडांमुळे हा जिल्हा साहसी पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाणच ठरलं आहे. इतकेच नाही तर, जिल्ह्यातले किल्ले, मंदिरं आणि वनसंपदा यांमुळे धार्मिक तसेच निसर्ग पर्यटनालाही इथे मोठा वाव आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा
सिंधुदुर्गातील पर्यटनाच्या अगणित संधी विचारात घेऊनच सरकारने सिंधुदुर्ग सागरी पर्यटन प्रकल्पाची संकल्पना ही जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेच्या विस्ताराला केंद्रस्थानी ठेवूनच मांडण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पाण्याखालचे संग्रहालय अर्थात अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रशीर (आर्टिफिशियल रीफ) आणि पाणबुडी पर्यटन यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजना त्यादृष्टीनेच आखल्या गेल्या आहेत.
पाण्याखालचे संग्रहालय अर्थात अंडरवॉटर म्युझियम
पाण्याखालचे संग्रहालय उभारण्यासाठी भारतीय नौदलाच्या गुलदार या सेवानिवृत्त युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे संग्रहालय पाहताना पर्यटकांना साहस आणि सागरी जैविक परिसंस्थेचे अनोखा मिलाफ अनुभवायला मिळेल अशीच त्याची रचना असेल. स्वाभाविकपणे पाण्याखालचा वावर आणि जगण्याचा अनुभव देणारे हे संग्रहालय पर्यटकांसाठी एक अनोखे आकर्षण ठरेल.
कृत्रिम प्रशीर (आर्टिफिशियल रीफ)
या प्रकल्पाअंतर्गतची महत्त्वाची योजना म्हणजे अरबी समुद्रातील सागरी जैविक परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी कृत्रिम प्रवाळ तयार केले जाणार आहेत. यामुळे इथल्या सागरी जैवविविधतेच्या संवर्धनाचा प्रयत्नांनाही नवा आयाम मिळणार आहे. दुसरीकडे अशा प्रयत्नामुळे पर्यटकांसाठी देखील समुद्राच्या तळाशी वावरणाऱ्या जलचारांच्या वैविधतेचे दर्शन घेण्याच्या संधीतही मोठी भर पडणार आहे.
पाणबुडी पर्यटन
या प्रकल्पाअंतर्गतची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पाणबुडी पर्यटन पर्यटक. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातल्या अद्भुत जैविक परिसंस्थेचे दर्शन आणि अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही योजना पर्यटकांसाठी साहस आणि जगण्यातल्या अविस्वरणीय अनुभवाची शिदोरी देणारी ठरेल. पर्यटकांना पाणबुडीतूनच सागरी जैवविविधतेचं, रंगीबेरंगी मासे, प्रवाळं आणि एका अर्थाने निसर्गाचा चमत्कार थेट अनुभवायला मिळेल. यातून पर्यटकांना साहसाचा रोमांचही अनुभवता येईल. एका अर्थाने ही योजना सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला नवा आयाम देणारी ठरणार आहे.
स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार
या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. या प्रकल्पामुळे अंदाजे १,००० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्थानिक मच्छीमार, हस्त कारागीर उद्योजक आणि व्यावसायिक तसेच पर्यटन सेवा क्षेत्रातील उद्योजक यांना या प्रकल्पातून रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उलब्ध होतील. याशिवाय पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवा जिल्ह्याची सीमा ओलांडून देश-विदेशापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार आहे.
पर्यावरणीय संवेदनशीलता
सिंधुदुर्ग सागरी पर्यटन प्रकल्प पर्यावरणस्नेही पद्धतीनेच राबवला जाणार आहे. सागरी जैविक परिसंस्थेचे संरक्षण आणि जैवविविधतेला संवर्धन करणे ही या प्रकल्पाअंतर्गची महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत. इतकेच नाही तर गोव्यातून सिंधुदुर्गपर्यंत एक सुसंगत पर्यटन मार्ग तयार करण्याची कल्पनाही या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष साकारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासाचे भविष्यवेधी पाऊल
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा हा प्रकल्प जागतिक पर्यटन नकाशावर केवळ जिल्ह्याचेच नाही तर भारताचे स्थान अधिक बळकट करणारा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे साहसी आणि सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गचे नावही सर्वदूर पोहोचण्यात मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला आणि भारताच्या पर्यटन क्षेत्राला एक नवी दिशा मिळू शकणार आहे. म्हणूनच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे झालेला आनंद व्यक्त करतानाच्या त्याचा दीर्घकालीन प्रभावाचे भाकीतच त्यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशातून व्यक्त केलं आहे. पर्यटन हा केवळ उद्योग नाही, तर तो लोकांच्या जीवनात समृद्धी आणणारा एक सेतू आहे आणि या प्रकल्पामुळे भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडेल, असा विश्वास त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटन प्रकल्पामुळे या प्रदेशाचा कायापालट होईल. हा प्रकल्प केवळ स्थानिक विकासालाच चालना देणार नाही, तर महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रालाही एक नवी दिशा मिळवून देईल असा विश्वास त्यांनी देखील व्यक्त केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून होत असलेली ही सुरुवात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाही, तर अवघ्या भारताच्या सागरी पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, पर्यावरणीय संवेदनशीलता, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा प्रकल्प शाश्वत विकासाच्या प्रक्रियेतला एक आदर्श प्रकल्प ठरेल, हे निश्चित. लेखक पत्र सूचना कार्यालय मुंबई येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.