नवी दिल्ली : केंद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचा 85 वा वाढदिवस असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील पवारांच्या भेटीला पोहचलेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार दिल्ली येथे वास्तव्याला आहेत. अमित शहा गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमाराला पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी दाखल झाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार केला, तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटायला गेले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तसेच, अजित पवारांच्या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच अजित दादांच्या पाठोपाठ अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे? अशा चर्चांनाही सुरुवात झाली आहे.