Tuesday, January 14, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यखोटं बोलणारी व्यक्ती स्वत:ला फसवते

खोटं बोलणारी व्यक्ती स्वत:ला फसवते

अनेकदा खोटं बोलताना आपल्याला आधीच सत्य माहिती असते अथवा ती नंतर समजते. ज्याच्याकडून ते ऐकायला हवं तो जेव्हा भलतंच सांगून वेळ मारून नेतो तेव्हा याचा आपल्यावर विश्वास नाही का? आपल्याला खरं सांगायला हा पात्र समजत नाही का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हेच खोटं जर आपल्या जिव्हाळ्यातील व्यक्ती बोलली तर अजूनच भावना दुखावल्या जावून आपण दुःखी होतो आणि ते स्वाभाविक आहे; परंतु, ती खोटं बोलणारी व्यक्ती ही स्वत:ला फसवत असते, समोरच्याला नाही.

मीनाक्षी जगदाळे

खोटी माहिती पसरवण्या मागील हेतू कॉम्प्लेक्स म्हणजेच गुंतागुंतीचे असतात. व्यक्तिगत पातळीवर स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलणे. आपण खूपदा बघतो एखाद्या व्यक्तीने खूप मोठी चूक केलेली असते जेव्हा त्याचं पितळ उघडे पडेल, भांडाफोड होईल असं त्याला वाटतं तेव्हा तो सैरभैर होतो आणि स्वतःला वाचवायला आपण काहीच केलं नाही, आपण जबाबदार नाही, जे काही झालं ते दुसऱ्यामुळे, इतरांमुळे, कोणीतरी आपल्या विरुद्ध राजकारण केल्यामुळे, कट रचल्यामुळे असं दर्शवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच विषयाला वेगळं वळण देतो. अगदी लहान मूल सुद्धा स्वतःवर काही येत आहे म्हटल्यावर शिक्षा वाचवायला जसं इतर मुलांचं नावं पुढे करतो तसं मोठी माणसं पण करतात पण ते पूर्ण अभ्यास करून ठरवून आणि नियोजनपूर्वक समोरच्याला वेड्यात काढण्यासाठी. दुसरी गोष्ट काहीतरी लाभ किंवा फायदा मिळण्यासाठी खोटं बोलणे लाभ मग तो इतरांची सहानुभूती मिळवणे असेल, आर्थिक फायदा अथवा मदत मिळवण्यासाठी असेल, आपलं एखाद कामं काढून घेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी असेल लोकं खोटी कथा तयार करून सांगतात. नानाविध प्रकारे वेगवेगळ्या कथा-कथानक रचून स्क्रिप्ट तयार करून सांगितल्यावर, त्यामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांची फोडणी दिल्यावर समोरचा पण पाघळतो. वेळप्रसंगी रडून, खूप अगतिक होऊन, भावनावश होऊन खोटं बोलल्यास ते खरं वाटल्याशिवाय राहत नाही. अशा व्यक्तीपुढे लोकं हमखास फसतात आणि त्यातून त्याला स्वतःला जे हवे ते तो मिळवून घेतो.

आपल्या बाबतीतील इतरांची प्रतिमा बदलण्यासाठी खोटं बोलणे अनेकदा आपल्याबद्दल लोकांनी आपल्याला हवा तसाच विचार करावा असं आपलं मत आणि अट्टहास असतो. आपण कसेही असलो तरी लोकांनी आपल्याला जसे समजणे, ओळखणे अपेक्षित आहे तसेच समजावे, ओळखावे म्हणून खोट्याचा आधार घेतला जातो. ज्या लोकांना स्वतःची सारासार विचार शक्ती नसते, स्वतंत्र विचार करण्याची इच्छा नसते, जे फक्त नातं, प्रेम, भावना यातच गुरफटून जगत असतात त्यांची याबद्दल फसवणूक हमखास होते. आपल्याला जसं दाखवायचं तसं एखादा दाखवत राहतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा आयुष्यभर गैरफायदा घेतला जातो. त्यांच्या भावनांशी, मानसिकतेशी खेळलं जातं तरी त्यांना समजत नाही कारण त्यांना स्वतःची बौद्धिक पातळीच नसते, खरं-खोटं समजण्याची कुवत नसते.

व्यक्तिगत जबाबदारी फेटाळून लावण्यासाठी चुकीच्या माहितीचा आधार घेतला जातो. याचा देखील आपल्याला वारंवार अनुभव येत असतो. ज्या व्यक्तीला कशाची पण जबाबदारी घ्यायची नाही, मग ती कोणत्याही व्यक्तीची, नात्याची, व्यवहाराची, कामाची ती वेगवेगळ्या खोट्या सबबी पुढे करून ती जबाबदारी टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. जबाबदारी टाळण्यासाठी ही व्यक्ती त्या त्या गोष्टीबद्दल चुकीची, खोटी माहिती लीलया पसरवते. उदाहरणं द्यायचे झाले तर एखाद्या पतीला पत्नीची आर्थिक जबाबदारी नको आहे. कारण त्याला ती आवडत नाही आणि त्याच दुसरीकडे प्रेमप्रकरण आहे. यावेळी पतीला पत्नीवर होणारा खर्च टाळून तो प्रेयसीवर करायचा आहे तर तो तसं कोणाला उघड सांगू शकत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी सांगेन, ज्यामुळे त्याने प्रेयसी केली आणि तिच्यावर खर्च करणे त्याला कसे अपरिहार्य आहे हे सर्वांना पटवून देईल. आता त्या घरातील लोकांची बौद्धिक कुवत आणि समज किती असेल त्यावर या प्रकरणात ते काय भूमिका घेतात हे अवलंबून असेल.

खोटा नरेटिव्ह सेट करण्यामागील नैतिकता ही गुंतागुंतीची असते. प्रामाणिक आणि खरा संवाद हा एका चांगल्या स्वच्छ व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म समजला जातो; परंतु नैतिक कोंडीमुळे असे प्रसंग येऊ शकतात. जिथे सत्य आणि नैतिक तत्त्वाचे कॉन्फ्लिक्ट म्हणजेच चकमक होते. जेव्हा वैयक्तिक पातळीवर प्रामाणिकतेचे चांगले-वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. अनेकदा सत्य हरते किंवा सत्याची बाजू कमकुवत पडते कारण असत्याला साथ देणारे अथवा असत्य हेच खरं मानून चालणारे यांची संख्या जास्त असते. अनैतिकता किंवा खोटेपणा, चुकीची वृत्ती याला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणात आणि पटकन भेटतात कारण त्यातून खूप पटकन आणि मोठ्या प्रमाणात लाभ आणि फायदे असतात. सत्य, खरं, प्रामाणिक, नैतिक, मूल्य जपणारे काहीही व्यक्ती, व्यवहार, नाती मागे पडतात अनेकदा हारतात कारण त्यांना पुरेसं पाठबळ मिळत नाही आणि स्वतःला सिद्ध करत बसण्यासाठी ते खोट्याविरोधात धडपड करून स्वतःचा वेळ, शक्ती, बुद्धिमत्ता वाया घालवत नाहीत. या सर्व विषयावर काळ हेच औषध असतं. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’ या उक्तीनुसार कालांतराने उशिरा का होईना सत्याचा विजय नेहमीच होतो.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -