मुंबई : ह्या वर्षातील शेवटचा महिना संपण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक महत्वाची कामे ही नागरिकांना येत्या काही दिवसांत पूर्ण करायची आहेत. जी डेडलाइनसंपण्याच्या आधी पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये आयटीआर भरण्यापासून ते आधार कार्डमधील अपडेट आदी बाबींचा समावेश आहे. ही कामे १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत.
ज्यांचे आधार कार्ड १० वर्षे जुने आहे, ते १५ डिसेंबरपर्यंत ते मोफत अपडेट करू शकतात. नाव अपडेट करणे, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो देखील दुरुस्त करता येणार आहे. ठरलेल्या तारखेनंतर जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला आधार कार्ड सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी ५० रुपये शुल्क भरून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचबरोबर बायोमेट्रिक माहितीतील बदलांसाठी १०० रुपये देखील मोजावे लागणार आहेत.
असे करा आधार कार्ड अपडेट
– प्रथम संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/) जा. या ठिकाणी आधार क्रमांकाने लॉगिन करा.
– त्यानंतर प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस ऑप्शन सिलेक्ट करा. आधारसोबत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.
– त्यानंतर ‘डॉक्युमेंट अपडेट’ हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील. याची पडताळणी करा.
– आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ती सिलेक्ट करा. यानंतर विनंती केलेल्या कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
– जन्मतारीख एकदाच अपडेट करता येईल, हे लक्षात ठेवा.
ईपीएफओशी संलग्न खासगी क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सक्रिय करण्याची मुदतही संपत आली आहे. कर्मचाऱ्यांना आता १५ डिसेंबरपर्यंत आपले यूएएन आणि बँक खाते आधारशी लिंक करावे लागणार आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती, परंतु ईपीएफओने ती तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढवली.
यूएएन सक्रिय झाल्याने कर्मचारी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ईएलआय) योजनेचा लाभ घेऊ शकतील. सध्या चालू आर्थिक वर्षात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच माहिती अपडेट केली जात आहे. पुढील टप्प्यात जुन्या कर्मचाऱ्यांनाही आपला तपशील अपडेट करावा लागणार आहे.
उशिरा आयटीआर भरण्याची शेवटची संधी
जर एखाद्या करदात्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल तर ते भरण्यासाठी त्यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. करदाते विलंबाने आयटीआर भरू शकतात. आयटीआर उशिरा भरताना तुम्हाला दंड भरावा लागणार आहे, जो १००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत असू शकतो.
याशिवाय अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. १५ मार्चपर्यंत १०० टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के आणि १५ मार्चपर्यंत १०० टक्के रक्कम जमा करायची आहे. डेडलाइन ओलांडल्यास दंड आणि व्याज भरावे लागू शकते.